Hanuman Ansh Box Office Collection Hema Malini Reaction: नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. केवळ दोन कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांना बाहेरचा रस्ता दाखवला असून जबरदस्त कमाई केली आहे. आतापर्यंत हनुमान अंश या सिनेमाने १८३.२८ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. या सिनेमाचे सर्व जण कौतुक करीत असून, आता ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी हनुमान अंश या सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे.

हनुमान अंश या सिनेमाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे हेमा मालिनी यांनी कौतुक केले आहे. मथुरा येथे माध्यमांशी संवाद साधताना भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी भगवान हनुमानाच्या आशीर्वादामुळे सिनेमाला हे यश मिळाल्याचे सांगितले आहे. तसेच २१ वर्षीय तरुणीने सिनेमा निर्मितीचा अनुभव नसताना धाडसी निर्णय घेऊन आध्यात्मिक सिनेमा बनवल्याबद्दल निर्मात्या अनुप्रिया नागर यांचेही त्यांनी कौतुक केले.

‘हनुमान अंश’बद्दल हेमा मालिनी काय म्हणाल्या?

हेमा मालिनी म्हणाल्या, “इथे हनुमानजी आणि नीम करोली बाबांचं मंदिर आहे. मी नेहमी इथे येते आणि आज मला खूप आनंद होत आहे की, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आला आहे. हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. हा तर हनुमानजींचाच आशीर्वाद आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “ज्या मुलीने हा चित्रपट बनवला आहे, ती एक साधी, सामान्य मुलगी आहे. तिला चित्रपट निर्मिती म्हणजे काय, हेही माहीत नाही. पण, तिच्या योगदानामुळे हा चित्रपट इतका चांगला बनला आहे. प्रत्येक जण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. मलाही हा चित्रपट पाहायचा आहे.”

‘हनुमान अंश’ सिनेमाबाबत नीम करोली बाबा यांच्या कुटुंबातील आणि मूळ गाव असलेल्या अकबरपूरमधील ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराजजींचे जावई, जगदीश प्रसाद भटेले यांनी ‘हनुमान अंश’वर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी बाबांचे चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाहीत; पण बाबा हनुमानजींचे महान भक्त होते आणि त्यांना हनुमानजींचा आशीर्वाद होता. त्यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘हनुमान अंश’ हा सिनेमा खूप चांगला आहे.”

‘हनुमान अंश’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दरम्यान, हनुमान अंश या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले असून, त्यामध्ये लक्ष्मण दास यांचा ‘नीम करोली बाबा’ होण्यापर्यंतचा अद्वितीय प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. अवघ्या दोन कोटींमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीला अगदी कमी प्रतिसादामध्ये या सिनेमाची ओपनिंग झाली होती; पण नंतर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. ३५ व्या दिवशी सिनेमाने १.९७ कोटी रुपये कमावले असून, सिनेमाने भारतामध्ये १८३.२८ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.