विशाल चतुर्वेदी यांच्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चक्क चमत्कार घडवला आहे. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकची सुरुवात बॉक्स ऑफिसवर संथ गतीने झाली होती. मात्र, चित्रपटाच्या चौथ्या वीकेंडला कमाईत मोठी वाढ झाली.
विशेष म्हणजे, चौथ्या रविवारी चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई पहिल्या तीन आठवड्यांच्या एकत्रित कमाईपेक्षाही जास्त ठरली आहे. त्यामुळे ‘हनुमान अंश’च्या या अनपेक्षित बॉक्स ऑफिस कामगिरीची सध्या जोरदार चर्चा आहे.

अवघ्या २ कोटी रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘हनुमान अंश’ने आतापर्यंत ४७.३३ कोटी रुपयांचं ग्रॉस कमाई केलं आहे. तर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ४०.१३ कोटी रुपयांची कमाई केली असून, चित्रपटाची ऑक्युपन्सी ३० टक्के राहिली आहे. म्हणजेच, या चित्रपटाने आपल्या बजेटच्या २० पटाहून अधिक कमाई केली आहे. या हिट चित्रपटाची सर्वाधिक कमाई पहिल्या आठवड्यात नव्हे, तर चौथ्या आठवड्यात झाली आहे.

चौथ्या वीकेंडमध्ये ‘हनुमान अंश’ची तुफान कमाई

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘हनुमान अंश’ने २४व्या दिवशी म्हणजेच रविवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५,३६३ स्क्रीनवरून तब्बल १२.७५ कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या चार आठवड्यांहून अधिक काळातील चित्रपटाच्या प्रदर्शनात पहिल्यांदाच एका दिवसात त्याने १० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, गीतू मोहनदास आणि यश यांच्या कन्नड अॅक्शन थ्रिलर ‘टॉक्सिक’च्या हिंदी डब व्हर्जनने रविवारी १४.५० कोटी रुपये कमावले. ‘हनुमान अंश’ची कमाई या मोठ्या चित्रपटापेक्षा अवघ्या काही कोटींनी कमी होती.

‘हनुमान अंश’ने रविवारी इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’ आणि सनी देओल स्टारर राजकुमार संतोषी यांच्या ‘बटवारा १९४७’ या थिएटरमध्ये सुरू असलेल्या चित्रपटांनाही मागे टाकलं. ‘आवारापन २’ने रविवारी १.४० कोटी रुपयांची कमाई केली. तर ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट ‘हनुमान अंश’च्या एका आठवड्यानंतर, म्हणजे १४ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. ‘हनुमान अंश’७ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

‘हनुमान अंश’ने चौथ्या रविवारी केलेली १२.७५ कोटी रुपयांची कमाई ही पहिल्या तीन आठवड्यांतील चित्रपटाच्या एकूण ११.९० कोटी रुपयांच्या कमाईपेक्षाही जास्त आहे. म्हणजेच, पहिल्या तीन आठवड्यांत जितकी कमाई झाली, त्यापेक्षा अधिक कमाई चित्रपटाने केवळ चौथ्या रविवारी केली. चौथ्या शनिवारी म्हणजेच २३व्या दिवशी चित्रपटाने ४,१३७ स्क्रीनवरून ९.२५ कोटी रुपयांची कमाई करत १० कोटींच्या टप्प्याच्या जवळ पोहोचला. चौथ्या शुक्रवारी म्हणजेच २२व्या दिवशी २,८२९ स्क्रीनवरून झालेल्या ६.२५ कोटी रुपयांच्या कमाईच्या तुलनेत शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली.

‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात अत्यंत संथ झाली होती. ७ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १० लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतरच्या १५ दिवसांतही चित्रपटाची दैनंदिन कमाई ४ लाख रुपये (दुसरा शुक्रवार) ते ३० लाख रुपये (पहिला रविवार) या दरम्यानच राहिली. पहिल्या आठवड्यात १.०८ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कमाई घसरून ४० लाख रुपयांवर आली. मात्र, तिसरा आठवडा ‘हनुमान अंश’साठी टर्निंग पॉइंट ठरला. या आठवड्यात चित्रपटाने तब्बल १०.४० कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिस कमाईत तिसऱ्या आठवड्यातच मोठी झेप पाहायला मिळाली. या काळात कमाईत तब्बल २५०० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस, म्हणजेच २१व्या दिवशी गुरुवारी, चित्रपटाने १,२९४ स्क्रीनवरून २.१० कोटी रुपये कमावले. त्यानंतर चौथ्या शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत जवळपास तिपटीने वाढ झाली.

तिसऱ्या आठवड्यात ‘हनुमान अंश’च्या बॉक्स ऑफिस कमाईत १५ लाख ते २.३५ कोटी रुपयांपर्यंत चढ-उतार पाहायला मिळाला. प्रदर्शनानंतर पहिल्या १६ दिवसांपर्यंत लाखांमध्येच कमाई करणाऱ्या या चित्रपटाने अखेर तिसऱ्या रविवारी म्हणजेच १७व्या दिवशी १ कोटींचा टप्पा ओलांडला. या दिवशी केवळ ४८८ स्क्रीनवरून तब्बल २.२० कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने १ कोटींच्या दुपटीहून अधिक कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत झालेली ही मोठी वाढ पाहता चौथ्या वीकेंडला त्याचे शोही वाढवण्यात आले.

‘हनुमान अंश’ची कथा काय आहे?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ‘हनुमान अंश’ची कथा २०व्या शतकातील भारतावर आधारित आहे. चित्रपटाची कथा १३ वर्षीय लक्ष्मण दासपासून सुरू होते. आईच्या निधनानंतर तो ब्रजमधील आपलं घर सोडतो. त्यानंतर त्याचा एक खोल आध्यात्मिक प्रवास सुरू होतो आणि पुढे तो प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु नीम करोली बाबा बनतो. भगवान हनुमानांचे भक्त असल्यामुळे नीम करोली बाबा यांना अनेकदा ‘हनुमान अंश’ असं संबोधलं जातं.