Hanuman Ansh Box Office Collection Neem Karoli Baba Family Reaction : आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमा धुमाकूळ घालतो आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३० कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. भक्ती, प्रेम व समर्पण यांवर आधारित असलेला ‘हनुमान अंश’ सिनेमा पाहून प्रेक्षक भारावून गेले असून, सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. आता ‘हनुमान अंश’ सिनेमाबाबत नीम करोली बाबा यांच्या कुटुंबातील आणि मूळ गाव असलेल्या अकबरपूरमधील ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नीम करोली बाबांच्या कुटुंबीयांनी आणि भक्तांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच सिनेमामध्ये दाखविण्यात आलेले सर्व प्रसंग खरे असून, नीम करोली बाबांना हनुमानाचा आशीर्वाद लाभलेला आहे. तसेच सिनेमामध्ये त्यांच्याबाबत दाखविण्यात आलेले सर्व चमत्कार आणि चमत्कारिक घटना पूर्णपणे खऱ्या असल्याचे भक्तांनी सांगितले आहे.
नीम करोली बाबांच्या जावयांनी दिली प्रतिक्रिया
नीम करोली बाबा यांचे जावई, जगदीश प्रसाद भटेले यांनी हनुमान अंश सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी बाबांचे चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाहीत; पण बाबा हनुमानजींचे महान भक्त होते आणि त्यांना हनुमानजींचा आशीर्वाद होता. त्यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘हनुमान अंश’ हा सिनेमा खूप चांगला आहे.”
नीम करोली बाबांच्या एका पुतण्यानेही चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “बाबा माझे काका होते आणि आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. बाबांकडे हनुमानाची सिद्धी होती आणि सिनेमात दाखवलेल्या त्यांच्या लीला या सत्य घटनांवर आधारित आहेत. त्यांनी गावाचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. बाबांवर चित्रपट बनल्यानंतर गावात मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. परिसरातील लोकांची बाबांवर आधीपासूनच खूप श्रद्धा होती आणि आता सिनेमामुळे खूप लोकांना त्यांच्याबद्दल समजले. बाबांमुळे आमच्या गावाचे नाव पंचक्रोशीत गाजले.”
आमच्यासाठी खूप खास अनुभव – नातेवाईक
नीम करोली बाबा यांच्या एका नातेवाइकाने सांगितले, “मी लहानपणी बाबांबरोबर शिकत होतो. त्यावेळी माझे वय खूप कमी होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या आठवणी आता मला पूर्णपणे लक्षात नाहीत. ‘हनुमान अंश’ सिनेमामध्येसुद्धा माझी छोटी भूमिका दाखविण्यात आली आहे. बाबांकडे हनुमानजींची विशेष सिद्धी होती. आमच्यासाठी हा सिनेमा खूप चांगला आणि एक खास अनुभव आहे.”
नीम करोली बाबा यांचे गाव असलेल्या अकबरपूरमधील एक गावकरी म्हणाले, “बाबा आमच्या गावचे प्रमुख होते. त्यांचे बालपणही याच गावात गेले. चित्रपटात बाबांच्या आयुष्याशी संबंधित अनेक कथा आणि त्यांच्या लीलांचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट खरोखरच खूप चांगला आहे.”
‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
दरम्यान, विशाल चतुर्वेदी यांनी हनुमान अंश या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, अवघ्या दोन कोटींमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाने ३२ व्या दिवशी तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १५६.२० कोटी, तर भारतात १३२.१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
