Hanuman Ansh Producer meet Premanand Maharaj: आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली असून, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. पण, सिनेमा तयार करण्यापूर्वी निर्मात्यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती.

‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या निर्मात्या अनुप्रिया नाग यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेऊन, त्यांना या सिनेमाबद्दल सांगितले होते, तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले होते. यावेळी प्रेमानंद महाराज यांनी चित्रपटातून एखाद्या महान संताचे कार्य आणि त्यांचे जीवन पडद्यावर मांडताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, याबाबत निर्मात्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. अनुप्रिया नागर यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोणत्याही भौतिक गोष्टी असता कामा नये – प्रेमानंद महाराज

    प्रेमानंद महाराज यांना, धार्मिक मार्गाचे पालन करत एखादा चित्रपट बनवणे ही एक प्रकारची सेवाच मानली जाऊ शकते का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी संत महात्म्यांचे चरित्र मांडताना ती एक जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली. ते म्हणाले, “एखाद्या महान पुरुषाच्या जीवनाच्या चरित्राचे अनुकरण करणे खूप अवघड असते हे लक्षात ठेवा. त्यामध्ये कोणत्याही भौतिक गोष्टी असता कामा नये. कारण- एखाद्या महान संताच्या जीवनावर आधारित सिनेमा पाहिल्यानंतर विरक्ती, समर्पण आणि ज्ञानाची भावना निर्माण झाली पाहिजे.”

    पुढे प्रेमानंद महाराज म्हणाले, “महापुरुषाचे चरित्र सिनेमा स्वरूपात मांडताना त्यामध्ये खऱ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळी अशी दृश्ये किंवा अभिनय असता नये. महापुरुषाच्या चरित्रापेक्षा वेगळे असे चित्रण व्हायला नको, जो अपराध ठरू शकतो. त्यामुळे सावध राहा.”

    ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

    दरम्यान, फक्त दोन कोटी रुपयांच्या अत्यंत कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘हनुमान अंश’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या सिनेमाने तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिकचा टप्पा पार केला असून, प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. त्यामध्ये नीम करोली बाबा यांचे भक्ती, सेवा व करुणा हे या स्वभावगुण प्रभावीपणे चित्रपटातून मांडण्यात आले आहेत. हनुमानावरील त्यांचे निस्सीम प्रेम आणि भक्ती त्यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले असून, रागिणी एस., नम्रता जी. सिंह, अनुप्रिया ए. नागर व विशाल चतुर्वेदी यांनी निर्मिती केली आहे.