Hanuman Ansh Movie Visually Impaired Singer Treatment: आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. सिनेमा रिलीज होऊन आठ आठवडे झाले असून अजूनही सिनेमा कोट्यवधींची कमाई करत आहे. सिनेमातील ‘मैंने तेरे ही भरोसे हनुमान’ हे गाणे प्रचंड गाजले. हे गाणे दृष्टिहीन गायक सुनील लोधी यांनी गायले असून आता सिनेमाचे निर्माते हे त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च करणार आहेत.

सुनील लोधी यांनी गायलेल्या ‘मैंने तेरे ही भरोसे हनुमान’ गाण्याने त्यांना जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांनी आपल्या गाण्यातून भक्तिभाव मांडला असला तरी त्यांना डोळ्यांनी हे जग दिसत नाही. मात्र, आता ‘हनुमान अंश’ सिनेमाच्या निर्मात्यांनी सुनील लोधी यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लवकरच सुनील हे सुंदर विश्व पाहू शकणार आहेत. याबाबत सिनेमाच्या निर्मात्या अनुप्रिया नागर यांनी सांगितले आहे.

नोव्हेंबरमध्ये उपचारांना सुरुवात

‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुप्रिया नागर यांनी सांगितले की, सुनील मुंबईत आल्यानंतर एका नेत्रतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी केली जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या उपचारांना सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, अजून उपचार आणि हॉस्पिटल कोणते असणार, याबाबत निर्णय घेतलेला नाही. सुनील मागच्या वेळी मुंबईत आले होते, तेव्हा अनुप्रिया यांनी एका नेत्रतज्ज्ञांकडे त्यांची अपॉइंटमेंटही घेतली होती, मात्र त्यावेळी त्यांची तपासणी होऊ शकली नव्हती.

अनुप्रिया पुढे म्हणाल्या, “जेव्हा मी सुनील भय्यांशी बोलते, तेव्हा मला जाणवते की लोकांच्या मनात खूप निराशा असते. कधी-कधी ते देवाला ‘तुम्ही माझ्याबरोबर नाही तर माझ्याविरोधात आहात’ असे म्हणतात. पण, जेव्हाही मी सुनील भय्यांशी बोलते, तेव्हा ते नेहमी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे श्रेय महाराजजी, म्हणजेच हनुमानजींना देतात. त्यांच्या या विचारांनी आणि श्रद्धेने मी खूप प्रभावित झाले आहे.”

अनुप्रिया पुढे म्हणाल्या, “सुनील हे लहानपणापासूनच दृष्टिबाधित आहेत. मला वाटतं की, जर ते प्रेम अनुभवू शकतात, तर त्यांना ते प्रेम पाहण्याची संधीही मिळायला हवी.”