Hanuman Ansh Producer Anupriya Nagar Success Story: केवळ दोन कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘हनुमान अंश’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. सकारात्मक ‘वर्ड-ऑफ-माऊथ’मुळे सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ २१ वर्षीय तरुणीने निर्मिती करीत पदार्पणातच सिनेमा यशस्वी करून दाखवला आहे. यूकेमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ बाथ’मध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या ‘हनुमान अंश’च्या निर्मात्या अनुप्रिया नागर यांची जोरदार चर्चा आहे.
अनुप्रिया नागर यांनी घेतलेली प्रेमानंद महाराजांची भेट
‘हनुमान अंश’च्या निर्मात्या अनुप्रिया नागर यांची निर्माती म्हणून ही पहिलीच वेळ असून, त्या केवळ २१ वर्षांच्या आहेत. अवघ्या कमी वयामध्ये आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती केली. सिनेमा तयार करण्यापूर्वी अनुप्रिया नागर यांनी वृंदावन येथील आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेत, त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या तरुणीच्या सिनेमाची आणि तिच्या धाडसाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
कोण आहे अनुप्रिया नागर?
‘हनुमान अंश’च्या निर्मात्या अनुप्रिया नागर यांचा जन्म मुंबईमध्ये झाला असून, नंतर त्या शिक्षणासाठी परदेशात गेल्या. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार, त्या अर्थशास्त्रज्ञ, चित्रकार व चित्रपट निर्मात्या आहेत. अनुप्रिया यांनी यूकेमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ बाथ’मध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. परदेशामध्ये शिक्षण घेतले असले तरी त्यांनी त्यांची चित्रकलेची आवड कायम जपली. विद्यापीठामध्ये कलासंबंधित कार्यक्रमांचे नेतृत्व केले.
बाथ विद्यापीठात त्या ‘वूमन इन बिझनेस सोसायटी’मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यामध्ये बिझनेसची ओढ निर्माण झाली. पुढे त्यांनी कला व बिझनेस यांची सांगड घालत पहिल्यांदाच हिंदी सिनेविश्वामध्ये निर्माती म्हणून ‘हनुमान अंश’ सिनेमाद्वारे सुरुवात केली. सिनेसृष्टीत सध्या यश मिळवले असले तरी बॉलीवूडमध्ये काम करण्याचा त्यांचा सुरुवातीपासून विचार नव्हता.
नीम करोली बाबा यांच्याबाबत निर्माण झाले कुतूहल
एका मुलाखतीत अनुप्रिया नागर म्हणालेल्या, “विद्यापीठामध्ये शिकत असताना गुंतवणूक व बँकिंग यावर अभ्यास करीत असताना त्यांना या विषयाची कल्पना सुचली. या अभ्यासाचा भाग म्हणून त्यांनी स्टीव्ह जॉब्स यांचा एक विचारवंत म्हणून अभ्यास केला. त्यावर संशोधन करताना स्टीव्ह जॉब्स यांचा भारत दौरा आणि नीम करोली बाबा यांच्यातील संबंध यांबद्दलची माहिती त्यांना समजली. २० व्या शतकामध्ये भारतातील आध्यात्मिक गुरूंबाबत परदेशामध्ये निर्माण झालेली श्रद्धा याबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांची नीम करोली बाबांबद्दलची उत्सुकता खूपच वाढली. त्यामुळे महाराजजींच्या आध्यात्मिक प्रवासाचा त्यांनी सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांच्या जीवनाची कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा विचार त्यांच्या मनात आला.”
एक वर्ष जाणून घेतला महाराजजींचा आधात्मिक प्रवास
पुढे अनुप्रिया यांनी सांगितले, “नीम करोली बाबा यांच्या जीवनप्रवासावर आधारित सिनेमा तयार करण्याचा विचार केल्यानंतर, आमच्या टीमने एक वर्ष या विषयावर संशोधन केले. त्यांनी भेटी दिलेल्या विविध ठिकाणी जाऊन, त्यांचा आधात्मिक प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महाराजजींना ओळखणाऱ्या किंवा त्यांची भेट झालेल्या लोकांशी संवाद साधून, त्यांच्याकडून महाराजजींबद्दल जाणून घेतले. त्यावेळी नीम करोली बाबांशी संबंधित चित्रकूट व वृंदावन या ठिकाणी भेट दिली होती.”
‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करण्याची शक्यता
दरम्यान, विशाल चतुर्वेदी यांनी दिग्दर्शित केलेला ‘हनुमान अंश’ सिनेमा लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. कमी बजेट आणि केवळ १० लाखांची ओपनिंग मिळविलेल्या या सिनेमाने आता मात्र बॉक्स ऑफिसवर आघाडी घेतली आहे. यशच्या टॉक्सिक या सिनेमालाही मागे टाकून ‘हनुमान अंश’ विक्रमी कमाई करीत आहे
