Hanuman Ansh Sequel Virat Kohli Anushka Sharma Cameo: आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमा लवकरच २०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवले असून लवकरच सिक्वेलसुद्धा येणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले. ‘हनुमान अंश’ सिनेमाच्या पुढच्या भागामध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या कॅमिओ भूमिका असण्याची शक्यता आहे.

विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांसारखे अनेक सेलिब्रिटीसुद्धा ‘नीम करोली बाबा’ यांचे भक्त आहेत. ‘हनुमान अंश’च्या सिक्वेलमध्ये या सेलिब्रिटींची आश्रमाला भेट आणि त्यांची श्रद्धा दाखवण्याची शक्यता आहे. याबाबत सिनेमाच्या सह-निर्मात्या नम्रता सिंग यांनी सिनेमाचे अजून दोन सिक्वेल येणार असून तीन भागांमध्ये महाराजजींची गाथा मांडण्याची योजना असल्याचे सांगितले. तसेच यातील संभाव्य कॅमिओसाठी अनेक प्रमुख भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींशी संपर्क साधला असल्याचे नम्रता सिंग यांनी सांगितले.

‘हनुमान अंश’च्या सिक्वेलमध्ये काय असणार?

‘बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रता सिंग यांनी ‘हनुमान अंश’ सिनेमा सुरुवातीपासूनच तीन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे सांगितले. हनुमान अंश ‘ट्रायलॉजी’ स्वरूपात असून यातील पहिल्या भागामध्ये त्यांचा सुरुवातीचा प्रवास, उत्तराखंडमधील कैंची धाम आणि नंतर पुढील आध्यात्मिक प्रवास दाखवण्यात येणार असल्याचे नम्रता सिंग यांनी सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या, “हनुमान अंशच्या सिक्वेलबाबत अजून लिहिण्यात आलेले नाही. आम्हाला थोडा ब्रेक घ्यावा लागेल, कारण मागील दीड वर्षांपासून आम्ही पूर्णवेळ काम करत असून ब्रेक घेतलेला नाही. सिनेमा रिलीज झाल्यानंतर वेळ मिळेल असे वाटले होते, पण अजूनही आम्हाला आराम मिळालेला नाही, त्यामुळे पुढील ९० दिवसांनंतर आम्ही पुन्हा एकदा काम सुरू करू.”

Virat Kohli and Anushka Sharma cameo expected in Neem Karoli Baba movie Hanuman Ansh movie sequel
विराट कोहली व अनुष्का शर्मा (फोटो -इन्स्टाग्राम)

‘हनुमान अंश’ ट्रायलॉजीचा तिसरा भाग आंतरराष्ट्रीय स्तरावर असणार आहे. यामध्ये आम्ही परदेशातील लोक कसे बाबांचे भक्त झाले, याचा प्रवास दाखवणार आहोत. नीम करोली बाबांनी आध्यात्मिक प्रसार करून भारताची ओळख जगभर कशी पोहोचवली, यावर आधारित तिसरा भाग असेल. यामध्ये परदेशी लोकांना, जसे की स्टीव्ह जॉब्स असोत, मार्क झुकरबर्ग, ट्विटरचे संस्थापक जॅक डॉर्सी किंवा ज्युलिया रॉबर्ट्स यांना कसे प्रभावित केले, याबद्दल सांगितले जाईल.

Neem Karoli Baba biopic movie Hanuman Ansh sequel
‘हनुमान अंश’ सिनेमाचा सिक्वेलमध्ये सेलिब्रिटी झळकण्याची शक्यता

यानंतर नम्रता सिंग यांनी ज्युलिया रॉबर्ट्स, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या नीम करोली बाबांचे भक्त असलेल्या सेलिब्रिटींशी संपर्क साधला होता का असे विचारण्यात आले. यावर त्या म्हणाल्या, ‘हनुमान अंश’च्या सिक्वेलमध्ये छोट्या भूमिकांसाठी (कॅमिओ) आम्ही काही सेलिब्रिटींशी संपर्क साधला. त्यांना या सिनेमाबाबत आधीपासूनच सगळं माहीत आहे.”