‘हनुमान अंश’ हा नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे यशस्वी ठरत आहे. थिएटरमध्ये साधारण सुरुवात झाल्यानंतर चित्रपटाने आता १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या यशादरम्यान लेखक-दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी १९७५ सालचा चित्रपट ‘जय संतोषी माँ’ हा ‘हनुमान अंश’ बनवण्यासाठी मोठी प्रेरणा ठरल्याचा खुलासा केला आहे. या चित्रपटासाठी त्यांनी त्यांचं मानधनही घेतलं नसल्याचं सांगितलं.
‘द रौनक पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीत विशाल यांनी सांगितलं की, ते गेल्या दीड वर्षांपासून विजय शर्मा यांच्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाचा अभ्यास करत होते. आध्यात्मिक आणि भक्तिपर चित्रपटांची या क्षेत्रात कमतरता असल्याचं त्यांना जाणवलं होतं.
जुन्या हिंदी चित्रपटापासून मिळाली प्रेरणा
ते म्हणाले, “जय संतोषी माँ हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे, मात्र त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी या चित्रपटाचा बारकाईने अभ्यास करत आहे, कारण या प्रकारच्या चित्रपटांची एक पोकळी निर्माण झाली आहे. शोलेबरोबर प्रदर्शित झालेला हा आध्यात्मिक चित्रपट होता, मात्र त्याने आपल्या बजेटच्या तब्बल १०० पट अधिक कमाई केली. हा केवळ ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट नव्हता, तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट होता. मात्र, हा प्रकारच का संपवण्यात आला आणि पुन्हा तसा कोणताही चित्रपट का बनवला गेला नाही, हा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता.”
‘हनुमान अंश’साठी विशाल यांनी चार महिने केला फळांचा आहार
‘हनुमान अंश’ची निर्मितीही करणाऱ्या विशाल यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मानधन घेतलं नसल्याचा खुलासा केला. “मी या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. त्यामुळे मी या चित्रपटासाठी मानधन घेतलं नाही” असं त्यांनी सांगितलं. भक्तिपर चित्रपटाची निर्मिती करताना त्यांनी सेटवरील वातावरणाबद्दलही सांगितलं. “सेटवर केवळ शाकाहारी जेवण दिलं जायचं आणि आम्ही दररोज हनुमान चालिस पठण करायचो. खरं तर, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी जवळपास साडेचार महिने मी फळांचा आहार घेत होतो,” असं त्यांनी सांगितलं.
