Jaya Bachchan Birth Day Special: ‘गुड्डी’ सिनेमा आला तेव्हा हिंदी सिनेसृष्टीला अत्यंत अवखळ आणि भूमिकेबद्दल तितकीच सजग असणारी अभिनेत्री मिळाली. ‘हम को मन की शक्ती देना, मन विजय करे’ या गाण्यात दोन वेण्या घातलेली जया भादुरी पुढे महानायकाची पत्नी होईल आणि राज ठाकरेंशी पंगा घेईल असं कुणाला सांगितलं असतं, तर तेव्हा खरंही वाटलं नसतं. जया भादुरी या बच्चन झाल्या आणि त्यांचं सगळं आयुष्यच बदलून गेलं असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही. अमिताभ बच्चन यांची पत्नी होणं हे सोपं नाही. मात्र ती ओळख त्यांनी मिरवली आणि महानायकाची पत्नी होणं काय असतं, हे दाखवूनही दिलं. ‘रेखा’ नावाचं वादळही त्यांनी आपल्या खंबीरपणाने परतवून लावलं.
गुड्डीने ओळख मिळवून दिली!
अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ चा. त्यांचा पहिला सिनेमा १९६३ साली आला. सत्यजीत रे यांच्या ‘महानगर’ मध्ये त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच भूमिका साकारली होती. मात्र ‘गुड्डी’ येईपर्यंत १९७१ हे वर्ष उजाडलं होतं. त्याच सिनेमाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया भादुरी हे एकमेकांना भेटले. अमिताभ बच्चन यांना जया भादुरी एका नजरेतच आवडल्या होत्या.मात्र जया भादुरी यांना अमिताभ पहिल्या भेटीत मुळीच आवडले नव्हते, त्यांनीच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. ऋषीकेश मुखर्जी हे गुड्डी सिनेमाचे दिग्दर्शक होते. त्यांच्यामुळेच दोघांची भेट झाली, दोघांमध्ये चांगली मैत्रीही झाली.
जया आणि अमिताभ यांचं प्रेम कसं बहरलं?
‘बावर्ची’ या सिनेमाच्या सेटवर अमिताभ आणि जया यांचं प्रेम जुळलं. अमिताभ बच्चन तेव्हा रोज जया बच्चन यांना भेटायला जात असत. बावर्चीमध्ये राजेश खन्ना नायकाच्या भूमिकेत होता. मात्र जया भादुरी यांना त्यांचा नायक अमिताभ यांच्या रुपाने गवसला होता. अमिताभ बच्चन तेव्हा स्ट्रगल करत होते. १९७३ मध्ये जंजीर सिनेमा आला. त्यात हे दोघंही होतेच. याच चित्रपटाच्या वेळी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्न पार पडलं ते एकदम घाईत.
अमिताभ आणि जया यांच्या लग्नाचा किस्सा
‘जंजीर’ सिनेमा हिट झाला तर आपण लंडनला फिरायला जायचं असं ‘जंजीर’च्या टीमने ठरवलं होतं. अर्थात त्यात अमिताभ आणि जया बच्चन होतेच. ‘जंजीर’ सिनेमा नुसता हिट झाला नाही तर ब्लॉकबस्टर ठरला. तसंच अमिताभ बच्चन यांची ‘अँग्री यंग मॅन’ची इमेजही तयार केली, ती याच सिनेमाने. अमिताभ यांनी ठरल्याप्रमाणे लंडनला जाण्याची तयारी सुरु केली. वडील हरिवंशराय बच्चन यांना ते ‘मी लंडनला जाऊ का?’ हे विचारायला गेले. लंडन? तिथे कोण कोण येणार? अमिताभ यांनी जया भादुरी यांचं नाव सांगितलं तेव्हा हरिवंशराय बच्चन यांनी नकार दिला. जयाबरोबर जायचं असेल तर तिच्याशी लग्न कर. लग्न न करता आम्ही तुला जाऊ देणार नाही अशी अट हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ यांना घातली. अमिताभ वडिलांचा शब्द टाळू शकले नाहीत. मग दोघांनीही पुढच्या २४ तासांत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या पाच ते सहा लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं आणि दुसऱ्या दिवशी दोघंही (अमिताभ आणि जया बच्चन) लंडनला रवाना झाले.
संवेदनशील अभिनेत्री म्हणून गाजवली कारकीर्द
जया भादुरी यांनी संजीव कुमार, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना या कलाकारांबरोबर काम केलं. ‘गुड्डी’नंतर ‘उपहार’, कोरा ‘कागज’, ‘बावर्ची’, ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘पिया का घर’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. कोशिश या सिनेमाचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण करिअरच्या इतक्या सुरुवातीलाच जया भादुरी यांनी मूकबधिर अभिनेत्रीची भूमिका साकारली. गुलजार यांनी हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. १९६१ मध्ये आलेल्या ‘Happiness of Us Alone’ या जपानी चित्रपटावर कोशिश आधारलेला होता. या सिनेमाच्या पटकथेसाठी गुलजार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर संजीव कुमार यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जया भादुरी यांच्या कामाचंही खूप कौतुक झालं.
‘अभिमान’ चित्रपट हा आजही लोकांच्या पसंतीस…
१९७३ मध्ये जया भादुरी या जया बच्चन झाल्या होत्या. या वर्षात त्यांचे आणखी दोन चित्रपट चर्चेत राहिले. एक होता अभिमान, दुसरा होता अनामिका. ‘अनामिका’मध्ये त्यांचे नायक होते संजीव कुमार. तर ‘अभिमान’ मध्ये होते अमिताभ आणि जया बच्चन. ऋषीकेश मुखर्जींच्या या सिनेमांमुळे जया आणि अमिताभ बच्चन यांची कारकीर्द आणखी बहरली. अमित कुमार हा प्रतिथयश गायक असतो, तो उमा नावाच्या मुलीशी लग्न करतो कारण त्याने तिचं गाणं ऐकलेलं असतं. ती जेव्हा अमित बरोबर गाऊ लागते तेव्हा लक्षात येतं की त्याच्यापेक्षा तिची गायकी श्रेष्ठ आहे. मग या दोघांमध्ये खटके उडू लागतात, तसंच दोघांच्याही स्वाभिमानाचा तिढा उभा राहतो. एक अत्यंत उत्तम संगीतमय प्रेमकहाणी या सिनेमांत चितारली आहे. ‘मीत ना मिला रे मन का..’, ‘लुटे कोई मन का नगर’, ‘तेरे मेरे मीलन की ये रैना’, ‘तेरी बिंदिया रे’ अशी सगळी सुपरहिट गाणी आणि उत्तम कथा यामुळे हा सिनेमा लोकांना खूपच आवडला.
शोलेतली राधा
…यानंतर आला शोले. अमिताभ बच्चन यांना ‘जंजीर’ मिळाला आणि त्यांच्या करिअरचा आलेख उंचावलाच. जया तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात आल्याच होत्या. ‘शोले’मधली जया बच्चन यांनी साकारलेली ‘राधा’ आजही लोकांच्या स्मरणात आहे. जय (अमिताभ बच्चन) बाजा वाजवत असतो, तेव्हा राधा (जया बच्चन) एक एक दिवा बंद करत येतात हा सीन तर कैक पिढ्यांनी तसाच्या तसा आजही स्मरणात ठेवला आहे. ‘चुपके चुपके’ हा देखील असाच सिनेमा होता ज्यात अमिताभ आणि जया होते. अत्यंत नर्मविनोदी सिनेमाने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
रेखा नावाचं वादळ कसं परतवलं?
अमिताभ बच्चन यांच्या करिअरने भरारी घेतली तेव्हा रेखा नावाचं वादळ जया बच्चन यांच्या आयुष्यात आलं. त्यावेळी अनेकदा गॉसिप चालायचं ते म्हणजे अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरचं. १९७७-७८ चा काळ असेल गॉसिपचे कॉलम भरुन येऊ लागले. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात रेखा येणं त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडणं आणि दोघांबद्दल मग प्रेक्षक, वाचक सगळ्यांना आकर्षण वाटणं, चर्चा होणं हे सगळं स्वाभाविक होतं. रेखा देखील भांगात सिंदूर लावून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहात असत. अमिताभ आणि रेखा यांनी गुपचूप लग्न केल्याच्याही चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. अमिताभ आणि जया बच्चन एकमेकांपासून वेगळे होणार आणि अमिताभ आणि रेखा लग्न करणार इथपर्यंत चर्चा रंगल्या. जया बच्चन शांत राहिल्या त्यांनी या सगळ्या प्रकरणांवर कुठलीही चर्चा केली नाही, प्रतिक्रिया दिली नाही. मात्र एक कृती त्यांनी केली ज्यामुळे रेखा अमिताभ यांच्या आयुष्यातून कायमच्या निघून गेल्या.
जया बच्चन यांनी रेखा यांना डिनरसाठी बोलवलं होतं
अमिताभ बच्चन एका सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने मुंबईच्या बाहेर गेले होते. त्यावेळी जया बच्चन यांनी रेखा यांना फोन केला आणि घरी बोलवून घेतलं. रेखा यांना वाटलं की, आता जया बच्चन आपल्याशी भांडतील, आपल्याला काहीतरी भलं-बुरं सुनावतील. मात्र जया बच्चन यांनी असं काहीही केलं नाही. रेखा यांना जेवणासाठी बोलवलं. रात्री रेखा नटून-थटून अमिताभ यांच्या घरी जाऊन जया बच्चन यांना भेटल्या. जया बच्चन यांनी रेखाचं स्वागत केलं. दोघींनी एकत्र जेवणं केलं, घर दाखवलं. सगळ्या गप्पा अगदी ‘नॉर्मल’ झाल्या. रेखा यांनी जेव्हा जया बच्चन यांचा निरोप घेतला आणि घरी जाऊ लागल्या तेव्हा जया यांनी रेखा यांना एकदम शांतपणे पण निक्षून एक गोष्ट सांगितली ‘काहीही झालं तरीही मी अमितला सोडणार नाही.’ यानंतर रेखा यांना लक्षात आलं की जया बच्चन या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. जया बच्चन आणि रेखा यांच्या ‘डिनर’च्या बऱ्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र नेमकं दोघींमध्ये काय बोलणं झालं त्याचा संपूर्ण तपशील कधीच बाहेर आला नाही. पण अमिताभ यांच्या आयुष्यातून रेखा दूर गेल्या.
जया बच्चन यांना आपल्याबद्दल काहीही कळलेलं असलं तरीही त्या तोंड उघडणार नाहीत, हे रेखा यांना कळून चुकलं होतं. त्यानंतरही उडत-उडत काही बातम्या आल्या. मात्र ‘सिलसिला’ हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासह १९८१ मध्ये रेखा यांनी केलेला शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात जया बच्चनही होत्या. या चित्रपटाची कथा ही बरीचशी अमिताभ, जया आणि रेखा यांच्या आयुष्यावर बेतलेली होती अशाही चर्चा झाल्या. मात्र त्या एका प्रसंगानंतर ‘सिलसिला’ नंतर रेखा अमिताभ यांच्या आयुष्यातून कायमच्या निघून गेल्या असं सांगितलं जातं.
‘सिलसिला’नंतरचा मोठा ब्रेक
‘सिलसिला’नंतर जया बच्चन दिसल्या, त्या १९९४ मध्ये आलेल्या ‘अक्का’ या मराठी चित्रपटात, तसंच १९९८ मध्ये त्यांनी ‘हजार चौरासी की माँ’ हा चित्रपट केला. या चित्रपटापासून त्यांची सेकंड इनिंग सुरु झाली. अमिताभ आणि जया बच्चन यांच्यातलं नातं ४८ हून अधिक वर्षे बहरलं आहे. अमिताभ यांचीही सेकंड इनिंग सुरु झाली होती. दोघांनी ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट केला. तसंच चरित्र भूमिकांमध्येही हे दोघं दिसू लागले.
जया बच्चन यांची राजकीय कारकीर्द
२००४ पासून जया बच्चन या राज्यसभेच्या खासदार आहेत. सध्या त्या पाचव्यांदा खासदार झाल्या आहेत. एक काळ असाही होता की रेखा आणि जया बच्चन या दोघींनाही राज्यसभेत शेजारी शेजारी बसलेलं देशानं पाहिलं. तसंच या दोघींमध्ये खूप चांगल्या प्रकारे हास्य विनोदही होताना पाहिले. त्याच्या बातम्याही झाल्या होत्या. राज्यसभेतली त्यांची इनिंग ही चांगलीच आक्रमक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जया बच्चन यांनी राज्यसभा आपल्या खास वक्तव्यांनी आणि भाषणांनी गाजवली आहे. जया बच्चन यांनी बॉलिवूडवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या कंगना रणौतलाही खडे बोल सुनावले होते ते राज्यसभेतूनच. कुछ लोग जिस थालीमें खाते हैं उसमेंही छेद करते हैं… असं त्या कंगनाला उद्देशून म्हणाल्या होत्या. पापाराझी फोटोग्राफर्सवर त्या अनेकदा चिडतानाही दिसून आल्या आहेत. मात्र त्यांनी राज ठाकरेंशी घेतलेला पंगा आजही लोकांच्या स्मरणात आहे.
राज ठाकरेंशी वाद आणि मग दिलगिरी
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी उत्तर प्रदेशात कन्या शाळा काढणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रात तशी कन्या शाळा का सुरु केली नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला होता. त्यांना उत्तर देताना मला फक्त बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत इतर कुठल्याही ठाकरेंना मी ओळखत नाही. राज ठाकरे कोण आहेत? जर त्यांना वाटत असेल की, आम्ही महाराष्ट्रात कन्या शाळा काढावी तर राज ठाकरेंनी त्यांची कोहिनूर मिलची जागा आम्हाला द्यावी आम्ही कन्याशाळा मुंबईत काढतो असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरेंनीही त्यांना उत्तर दिलं होतं. मग दोघांनीही दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र राज ठाकरेंशी असा थेट पंगा घेणाऱ्या त्या बहुदा एकट्याच असाव्यात.
एक उत्तम अभिनेत्री, एक स्त्री, महानायकाची पत्नी, राज्यसभा खासदार अशा विविध भूमिकांमध्ये आपण जया बच्चन यांना पाहात आलो आहे. सध्या त्या त्यांच्या अभिनयापेक्षा जास्त ओळखल्या जातात त्यांच्या तिखट वक्तव्यांमुळे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. लग्न केल्यानंतर प्रेम संपून जातं, उडून जातं या आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशा वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या वलयाची पर्वा न करता रोखठोक जगणाऱ्या आणि सगळी आव्हानं पेलून समर्थपणे उभ्या राहणाऱ्या जया बच्चन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!