Shefali Shah Ex Husband on Divorce: लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शाहने दिग्दर्शक विपुल शाह यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला दोन दशकांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, विपुल शाह यांच्याबरोबर लग्न करण्याआधी शेफाली शाह यांनी हर्ष छाया यांच्याबरोबर लग्न केले होते.

हर्ष छाया व शेफाली यांनी झी टीव्हीवरील ‘हसरतें’ या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यांनी १९९४ मध्ये लग्न केले होते. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. त्यांनी २००० मध्ये घटस्फोट घेतला. जेव्हा ते वेगळे झाले, तेव्हा तो काळ दोघांसाठीही अत्यंत कठीण होता, असे हर्ष व शेफाली यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

आता हर्ष छाया यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केले. घटस्फोट या शब्दाकडे चुकीच्या पद्धतीने बघितले जाते, त्यामुळे अनेकजण नको असलेल्या लग्नात अडकून राहतात. तसेच विभक्त होण्याबद्दल ते म्हणाले, “व्यक्तीनुसार ही प्रक्रिया वेगळी असते. आमची परिस्थिती अगदी स्पष्ट होती, मला दिसत होते की आमचे नाते एका अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. मी आता तुझ्याबरोबर राहू शकत नाही असे जेव्हा मला सांगण्यात आले होते, त्याच्या ८-९ महिने आधीच मला माहीत होते की हे होणार आहे. मी या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार होतो. काय होत आहे हे माहीत असूनही माझ्या मनावर परिणाम होऊ दिला नाही. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले. मी दिल्ली सोडली आणि मुंबईला आलो. कोण कशी परिस्थिती हाताळतं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. सुदैवाने मी सहजासहजी डगमगत नाही.”

“मी २-३ महिन्यांत अनेकदा…”

पुढे तो म्हणाला, “जेव्हा अशी परिस्थिती येते, तेव्हा तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे; जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर त्याबरोबर जगायला शिका. तुम्ही कणखर आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. मी पाच-सहा महिने त्याच भावनेबरोबर राहिलो, पश्चात्ताप झाला. मी ओरडलोदेखील. मी पाहिले की जेव्हा तुम्ही दु:खी असता, तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सर्वजण तुमची गोष्ट ऐकायला इच्छुक असतात. त्यावर त्यांना त्यांची मते सांगायची असतात. एकदा मी एका व्यक्तीशी बोललो, आम्ही एकमेकांच्या समस्यांवर चर्चा केली आणि नंतर आम्ही डेटवर गेलो. असे काही वेळा घडले. मी २-३ महिन्यांत अनेकदा डेट्सवर गेलो. याला वेळ लागतो, पण तेव्हा तुम्ही किती मजबूत आहात हे दाखविण्याची गरज नाही, त्या वेळी तुम्हाला काय वाटते हे दाखविण्याची गरज असते.”

पुढे ते घटस्फोटाबद्दल म्हणाले, “दोन व्यक्ती सतत एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. घटस्फोट होणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. जर घटस्फोट व्हायचा असेल तर तो नंतर होण्यापेक्षा थोडा आधी होतो, त्यामुळे नाते उगाचच ओढले जात नाही. जेव्हा आम्ही घटस्फोट घ्यायचा ठरवलं तेव्हा आम्ही सहा महिन्यांपासून वेगळे राहत होतो असं त्यांनी सांगितलं. आमच्या अर्जावर पूर्व-तारखेची नोंद करून घेतली. आम्ही त्यावर त्वरित कारवाई केली.”

दरम्यान, २०२४ मध्ये सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत विभक्त होणं ही कठीण गोष्ट होती, पण मी गोष्टी स्वीकारल्या आणि त्यातून बाहेर पडलो, असे वक्तव्य अभिनेत्याने केले होते. हर्षपासून विभक्त झाल्यानंतर शेफाली शाहने २००० साली दिग्दर्शक विपुल शाह यांच्याशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाला आता २५ वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत. हर्ष छायानेही २००३ साली सुनीता सेनगुप्ताशी लग्न केले.