Harshvardhan Rane and Sanjeeda Shaikh dating rumours: अभिनेते हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख पुन्हा एकदा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर जवळपास सारखेच फोटो शेअर केले असून, हे फोटो पुण्याजवळील पानशेत येथील असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

हर्षवर्धन राणे व संजीदा शेख रिलेशनशिपमध्ये आहेत का?

दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या ट्रिपचे फोटो शेअर केले. दोघांचे फोटो वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले असले तरी ते एकाच ठिकाणचे असल्याचे लक्षात येत आहे.

हर्षवर्धन राणेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो चहा बनवताना आणि अंडी शिजवताना दिसत आहे. याशिवाय तो ज्या Airbnbमध्ये राहिला होता, त्याचीही झलक पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, संजीदा शेखने चहाचा आनंद घेतानाचे काही फोटो शेअर केले. तिच्या टेबलवर दोन कप ठेवलेले दिसत आहेत. यातील आणखी एका फोटोमध्ये कुणीतरी ऑम्लेट बनवताना दिसत असून, त्यासाठी वापरण्यात आलेला पॅन आणि गॅस शेगडी ही हर्षवर्धनने शेअर केलेल्या फोटोंमधील पॅन आणि शेगडीसारखीच दिसत आहे. बाल्कनीही दोन्ही फोटोंमध्ये एकसारखी असल्याचे दिसत आहे. याबरोबरच, बॅकराऊंडला असलेली हिरवी झाडे आणि टेबलही सारखेच असल्याचे दोघांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

या दोन्ही कलाकारांनी फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी ते एकत्र असल्याचा अंदाज बांधला. ते दोघे डेट करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकाने संजीदाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “तू आणि हर्षवर्धन एकत्र आहात?”, दुसऱ्या एकाने हर्षवर्धनच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “मला वाटतं दुसरा कप संजीदासाठी आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवरुन तसेच वाटत आहे”, एकाने थेट लिहिले, “म्हणजे तुम्ही दोघे डेट करत आहात का?”

याआधीही २०२३ मध्ये संजीदा शेख आणि हर्षवर्धन राणे यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. एका ट्रीपदरम्यानचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. हर्षवर्धन आणि संजीदा यांनी यापूर्वी बिजॉय नांबियार यांच्या ‘तैश’ या शोमध्ये एकत्र काम केलs आहे.

दरम्यान, संजीदा शेखने यापूर्वी अभिनेता आमिर अलीबरोबर लग्न केले होते. तब्बल नऊ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी असून ती संजीदासह राहते.