Supriya Pathak wedding story : ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ मधील दमदार अभिनय आणि ‘खिचडी’ मालिकेतील हंसा या विनोदी पात्राने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे. अवघ्या २२ व्या वर्षी झालेलं पहिलं लग्न मोडल्यानंतर सुप्रिया पाठक यांची १९८६ मध्ये ‘अगला मौसम’ चित्रपटाच्या सेटवर पंकज कपूर यांच्याशी भेट झाली. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. आई दिना पाठक यांचा या नात्याला शेवटपर्यंत विरोध होता. सुप्रिया पाठक यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट जाणून घेऊयात.
सुप्रिया पाठक यांचं पहिलं लग्न अवघ्या २२ व्या वर्षी झालं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही. वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. १९८६ मध्ये सुप्रियांची भेट ‘अगला मौसम’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहीद कपूरचे वडील पंकज कपूर यांच्याशी झाली. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सुप्रिया व पंकज यांनी १९८८ साली दुसरं लग्न केलं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.
सुप्रिया पाठक व पंकज कपूर यांची पहिली भेट
“आम्ही एकत्र एक चित्रपट करत होतो आणि तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे तो कदाचित फक्त आमच्या भेटीसाठी बनवला गेला होता. आम्हा दोघांचाही भूतकाळ होता, पण तरीही प्रेमात पडलो आणि चित्रपटाचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. नंतर आम्ही आपापल्या मार्गाने गेलो. आम्ही एकत्र मुंबईत परतलो, पण तो चित्रपट प्रदर्शित झालाच नाही,” असं सुप्रिया पाठक ट्विंकल खन्नाच्या यूट्यूब चॅट शो ‘द आयकॉन्स’मध्ये म्हणाल्या होत्या.
सुप्रिया पाठक यांच्या आईचा होता विरोध
सुप्रिया पाठक यांच्या आई दिवंगत दिना पाठक यांना हे नातं मान्य नव्हतं, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. “सर्वांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणाचंही ऐकलं नाही. लग्न करायचंच आहे, हे मी माझ्या मनात ठरवलं होतं. माझ्या आईने तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत अगदी मला दोन मुलं झाल्यानंतरही माझं मन बदलण्याचा प्रयत्न केला. ‘तो तुला सोडून जाईल’ असं ती म्हणत राहिली. इतकी वर्षे झाली, तरीही ती ‘तुझी चूक झाली’ असं म्हणत राहिली. रत्ना दीदींनी मला या निर्णयात पाठिंबा दिला होता,” असं सुप्रिया पाठक यांनी सांगितलं.
सुप्रिया पाठक उत्तम अभिनेत्री आहेत. तसेच त्या शाहीद कपूरचे वडील पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. शाहीद पंकज कपूर व त्यांच्या पहिल्या पत्नी निलीमा अझीज यांचा मुलगा आहे. सुप्रिया पाठक यांचं सावत्र मुलगा शाहीद कपूरशी चांगलं नातं आहे. तसेच शाहीदची पत्नी मीरा राजपूतचे देखील सुप्रिया यांच्याशी चांगले संबंध आहेत. अनेक सण-उत्सव ते कुटुंब म्हणून एकत्र साजरे करत असतात.
