Hema Malini Latest Post : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील १२ दिवसांपासून धर्मेंद्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. अशातच मंगळवारी सकाळी त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या. त्यानंतर हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आहे.

धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले, अशा खोट्या बातम्या पसरल्याने देओल कुटुंबाला मनस्ताप झाला आहे. या अफवांबद्दल हेमा मालिनी यांनी नाराजी व्यक्त केली. हा सगळा प्रकार अत्यंत अपमानजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“जे घडतंय ते अक्षम्य आहे. उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अपमानास्पद आहे, हा बेजबाबदारपणा आहे. कृपया त्यांचा आदर करा आणि कुटुंबाला प्रायव्हसी द्या,” अशी पोस्ट हेमा मालिनी यांनी केली आहे.

हेमा मालिनी यांची पोस्ट

हेमा मालिनी यांची पोस्ट (सौजन्य – एक्स)

हेमा मालिनी यांच्या या पोस्टवर कमेंट्स करून चाहते धर्मेंद्र लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती ईशा देओलनेही दिली आहे.

“माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्या, अशी मी सर्वांना विनंती करते. माझे वडील बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार,” असं ईशा देओलने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत. सनी देओल, बॉबी देओल, तान्या देओल, सनीचा मुलगा करण हे रात्री रुग्णालयात गेले होते. त्यानंतर आता ईशा देओल व हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. सोमवारी रात्री सलमान खान, शाहरुख खान, आर्यन खान, अमीषा पटेल व गोविंदा यांनीही धर्मेंद्र यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली.