Hema Malini says daughters Esha and Ahana struggling: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ ला निधन झाले. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या अनेक आठवणी वेळोवेळी सांगतात. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली.
“देवाने मला धर्मेंद्र यांच्यासारखा…”
हेमा मालिनी यांनी ‘रिपब्लिक वर्ल्ड’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत धर्मेंद्र यांच्याबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, “देवाने मला धर्मेंद्र यांच्यासारखा उत्तम जोडीदार दिला याबद्दल मी कायम ऋणी राहीन. त्यांच्या आठवणी आयुष्यभर माझ्याबरोबर राहतील. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते माझा आधारस्तंभ होते.”
करिअरमध्ये धर्मेंद्र यांनी कायम पाठिंबा दिला, असेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “त्यांनी मला कधीच घरी बस कधीच सांगितलं नाही. त्यांना माहिती होतं की मी एक कलाकार आणि मला डान्स करायला आवडतो. त्यांनी माझी प्रगती पाहिली होती. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे की तू चित्रपट आणि डान्स सुरू ठेव. काहीही थांबवू नकोस. त्यांना संपूर्ण कुटुंब एकत्र राहावं असं नेहमी वाटायचं. ते कायम सांगायचे की नेहमी एकत्र राहा, मुलांबरोबर राहा.”
मुली ईशा व अहाना यांना वडिलांची आठवण येते, त्यांची पोकळी कोणी भरून काढू शकत नाही, असेही हेमा मालिनी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “मी आनंदी आहे, पण जेव्हा माझ्या दोन्ही मुली ईशा आणि अहाना यांना त्यांच्या वडिलांची उणीव जाणवत असल्याचं पाहते, तेव्हा खूप वाईट वाटतं. ती पोकळी कधीही भरून निघू शकत नाही.”
“तुमच्या दोघांच्या नात्यानेच आम्हाला…”, अहाना देओल म्हणाली…
या मुलाखतीत हेमा मालिनी यांच्यासाठी मुली अहाना आणि ईशा यांनी खास मेसेज पाठवले होते. अहाना देओने आईसाठी लिहिले, “मला तुझा नेहमी अभिमान वाटतो. तू धैर्याने संकटांचा सामना केलास. तू आणि बाबांनी स्वाभिमान, प्रामाणिकपणा, संयम आणि अमर्याद प्रेम या मूल्यांची शिकवण दिली. तुमच्या दोघांच्या नात्यानेच आम्हाला घडवलं. कुटुंबाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे. तुझं कामाप्रतीचं समर्पण, डान्स, चित्रपटसृष्टीतील योगदान आणि समाजसेवेची भावना यामुळे आम्हाला रोज प्रेरणा मिळते. तू आमच्यासाठी केवळ सुपरस्टार नाहीस, तर सर्वोत्कृष्ट आई आणि आजी आहेस.”
ईशा देओल म्हणाली….
ईशा देओलने व्हॉइस मेसेज पाठवला होता. ईशा म्हणाली, “आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझा खूप आदर करते. आपलं नातं प्रत्येक टप्प्यावर अधिक घट्ट झालं आहे. जग तुला ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखतं, पण मला हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी म्हणून ओळखतं आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तू आणि बाबांनी आमच्यासाठी जे काही केलं, त्याबद्दल आम्ही कायम ऋणी आहोत. तुमचा वारसा पुढे नेण्याचा आम्हाला अभिमान आहे. तुमच्या कष्टांमधून आणि आयुष्यातील प्रवासातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे.”
ईशा व आहानेचे मेसेज वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर हेमा मालिनी भावुक झाल्या. दरम्यान, हेमा मालिनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीतील वक्तव्ये आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे चर्चेत असतात.
