Dharmendra Prayer Meet : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी देओल कुटुंबाने मुंबईतील वांद्रे येथे ‘सेलिब्रेशन ऑफ लाईफ’ प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यासाठी बरेच कलाकार आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली, ईशा आणि अहाना देओल प्रार्थना सभेत अनुपस्थित होत्या.
देओल कुटुंबाने ताज लँड्स एंड येथे धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केला होता. सनी देओल, बॉबी देओल आणि करण देओलसह संपूर्ण देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला उपस्थित असलेल्या सर्वांचे हात जोडून आभार मानताना दिसले. शाहरुख खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा, रजत बेदी, शबाना आझमी, दिव्या दत्ता, मुकेश खन्ना, सोनू सूद, जया प्रदा, अमीषा पटेल आणि इतर सेलिब्रिटी प्रार्थना सभेला उपस्थित होते.
गायक सोनू निगम यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून दिवंगत अभिनेत्याची काही आवडती गाणी गायली. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली, ईशा देओल आणि अहाना देओल, २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांना प्रार्थना सभेला बोलावण्यात आलं होतं की नाही, याबद्दल माहिती नाही. अनेक सेलिब्रिटी ताज लँड्स एंड येथील कार्यक्रमाननंतर हेमा मालिनी यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
हेमा व धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलचा एक्स पती भरत तख्तानी प्रार्थना सभेला गेला होता. हेमा मालिनींची पुतणी, बॉलीवूड अभिनेत्री मधू शाहदेखील देओल कुटुंबाने आयोजित प्रार्थना सभेला गेली होती. बोनी कपूर यांनी हेमा मालिनींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
व्हिडीओ-
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली, ज्यात त्यांनी लिहिलं, “धरमजी माझे सर्वस्व होते आणि त्यांच्या जाण्याने आयुष्यात कधीच भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे जी कायम राहील.”
हेमा मालिनींनी आज, शुक्रवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. यात त्यांनी पती धर्मेंद्र यांच्याबरोबरचे व मुली ईशा व अहाना यांच्याबरोबरचे अनसीन फोटो पोस्ट केले.
