Hema Malini Shares Memories of Dharmendra : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी आपलं दुःख व्यक्त केलं.

दिल्लीतील प्रार्थना सभेत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासंबंधीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्या भावूक होत म्हणाल्या, “मी कधीही विचार केला नव्हता की, मला माझ्या धरमजींसाठी शोकसभा आयोजित करावी लागेल. संपूर्ण जग त्यांच्या निधनावर शोक करीत आहे. माझ्यासाठी हा एक असह्य धक्का आहे.”

पुढे त्या म्हणतात, “धरमजींबरोबर माझा ५७ वर्षांचा सहवास होता. जेव्हा मी चित्रपटसृष्टीत आले, तेव्हा मला बहुतेक चित्रपट फक्त त्यांच्याबरोबर करण्याची संधी मिळाली. आम्ही ४५ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि त्यापैकी २५ हून अधिक चित्रपट सुपरहिट झाले. आम्हाला इंडस्ट्री आणि प्रेक्षकांकडून ‘हिट जोडी’ म्हणून खूप प्रेम मिळालं. आमचं प्रेम खरं होतं. आता मला त्यांच्याशिवाय जगायला शिकावं लागेल.”

Award Banner

यानंतर त्या म्हणाल्या, “ते खूप आनंदी व्यक्ती होते. इतके प्रसिद्ध व्यक्तिमत्व असूनही, त्यांनी कधीही स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजलं नाही.” धर्मेंद्र यांना उर्दू कवितेचे पुस्तक लिहायचे होते. मात्र त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. या स्वप्नाबद्दलही हेमा मालिनींनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, “धर्मेंद्र यांनी वेगवेगळ्या शैलींमध्ये अनेक भूमिका केल्या, पण मला माहित आहे की त्यांना विनोद करायला खूप आवडायचं. त्यांना कॅमेऱ्यासमोर उभे राहण्याची खूप आवड होती. धरमजींमध्ये एक विशेष प्रतिभा होती, जी फार कमी लोकांना माहित होती ती म्हणजे – उर्दू शायरी लिहिणं. मी त्यांना सांगितलं की, त्यांनी त्यांच्या उर्दू कवितेचे पुस्तक लिहावे. त्यांना ते लिहायचे होतं; परंतू, ते स्वप्न आता अपूर्णच राहिलं.”

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या दिल्लीतील प्रार्थना सभेत कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेते रणजीत, कंगना राणौत आणि रवी किशन हेदेखील उपस्थित होते.