Hema Malini Fitness Routine: हेमा मालिनी ७७ वर्षांच्या आहेत आणि आताही त्या राजकीय जीवनात सक्रिय आहेत. त्या त्यांच्या मतदारसंघात दौरे करतात, त्याचबरोबर मनोरंजनविश्वातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरीही लावतात. या वयातही हेमा मालिनी खूप फीट आहेत. त्यामागचं कारण त्यांच्या डाएट व फिटनेस रुटीनमधलं सातत्य आहे. तुम्हालाही त्यांच्यासारखं फिट राहायचं असेल तर त्यांच्या डाएट फिटनेस रुटीनबद्दल जाणून घ्या.

हेमा मालिनी शाकाहारी आहेत, त्यांनी कधीच मांसाहार केलेला नाही. त्यामुळे त्या व्हेजिटेरियन डाएट फॉलो करतात. तसेच त्या तळलेले पदार्थ खात नाहीत. इडली, डोसा हे त्यांचे आवडते दाक्षिणात्य पदार्थ आहेत. त्या कमी तेलात जेवण बनवतात.

१. योगा आणि डान्स करतात हेमा मालिनी

हेमा मालिनी दररोज सकाळी ४५ मिनिटं योगासने करतात आणि त्यानंतरच इतर कामे करतात. योगामुळे त्यांचे मन शांत आणि शरीर सक्रिय राहते. योगासने केल्याने शरीरात लवचिकता टिकून राहते आणि थकवा जाणवत नाही. जिम वर्कआउट किंवा व्यायामापेक्षा त्यांना योगासने करणं जास्त आवडतं. तसेच त्या डान्स करतात, ज्यामुळे त्यांच्या मनाला शांतता आणि समाधान मिळते.

२. साखर, भात आणि पोळीपासून राहतात दूर

हेमा मालिनी कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. त्या बऱ्याच वर्षांपासून साखर खात नाहीत. साखरेऐवजी त्या गूळ किंवा मधाचा वापर करतात. पांढरी साखर आरोग्यासाठी हानीकारक असते, त्यामुळे ब्लड शुगर आणि लठ्ठपणा वाढतो. त्या अनेक वर्षांपासून पांढरी साखर खात नाहीत. हेमा मालिनी आपल्या डाएटबद्दल खूप कडक आहेत. त्या कधीही भात आणि पोळी एकत्र खात नाहीत. जर भात खाल्ला तर पोळी खात नाहीत आणि पोळी खाल्ली तर भात खात नाहीत. असं केल्याने शरीरात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी जाते आणि वजन वाढत नाही. जास्त कार्ब्स खाल्ल्याने शरीर फुगू लागते.

३. आठवड्यातून २ वेळा करतात उपवास

हेमा मालिनी फिट आणि सक्रिय राहण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि शुक्रवारी उपवास करतात. या दिवशी त्या फळं, मिठाशिवाय बनवलेले पदार्थ, नारळ पाणी, भाज्यांचा ज्यूस, पनीर या गोष्टी खातात. आठवड्यातून दोन दिवस उपवास केल्यामुळे पचनसंस्था चांगली राहते आणि शरीरात एनर्जी टिकून राहते.