Hema Malini on Dharmendra Family: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ ला निधन झाले. आजही संपूर्ण देओल कुटुंब त्यांच्या दु:खातून सावरू शकलेले नाही. त्यांची मुले ईशा देओल, बॉबी देओल, सनी देओल सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या आठवणीत अनेकदा भावना व्यक्त करतात.
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली होती. प्रकाश कौर यांच्याशी त्यांनी पहिले लग्न केले. त्यांना चार मुले आहेत. सनी, बॉबी, अजेता, विजेता अशी त्यांची चार मुले आहेत. १९८० मध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना मुली आहेत. ईशा व अहाना देओल अशी त्यांची नावे आहेत. जरी धर्मेंद्र यांनी दुसरे लग्न केले तरी त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला किंवा मुलांना अंतर दिले नाही. त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी घटस्फोट घेतला नाही.
आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोन्ही कुटुंबांनी वेगवेगळ्या शोकसभा आयोजित केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही कुटुंबात वाद असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या. हेमा मालिनींनी नुकतीच हिंदूस्तान टाइम्सला मुलाखत दिली. त्यांचे कुटुंब आणि धर्मेंद्र यांचे दुसरे कुटुंब म्हणजे प्रकाश कौर, सनी, बॉबी, अजेता, विजेता यांच्यात वाद, दुरावा आहे का यावर त्यांनी वक्तव्य केले.
“मुले एकमेकांवर खूप…”
त्या म्हणाल्या, “ते त्यांचे वडील होते. सगळीच मुले वडिलांसाठी काहीही करू शकतात. ईशा, अहाना असो किंवा सनी, बॉबी, अजेता, विजेता असो; ते त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम करतात. ही मुले एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोन्ही कुटुंबांमध्ये कोणतीही नकारात्मकता नाही. जिथे धरमजी असतात, तिथे नकारात्मकता नसते. धरमजींकडे त्यांची मूल्ये होती, प्रेम होते, तेच त्यांनी त्यांच्या सर्व मुलांनाही दिले आहे, शिकवले आहे.”
काही दिवसांपूर्वीच सनी देओलची महत्त्वाची भूमिका असलेला ‘बॉर्डर २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाच्या स्क्रिनिंगला ईशा व अहाना दिसल्या होत्या. मात्र, हेमा मालिनींच्या गैरहजेरीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्याबद्दल त्या म्हणाल्या, “मलासुद्धा आमंत्रण होते, पण मी जाऊ शकले नाही. मी जाऊन तो चित्रपट पाहावा यासाठी लोक उत्सुक होते. पण, आमच्यातील गोष्टी लोकांना का दाखवाव्या? तो आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, लोकांनी हे समजून घेतले पाहिजे.”
चित्रपटात पुन्हा काम करण्याबद्दल हेमा मालिनींना प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, “काही चांगल्या भूमिका आल्या तर मी नक्कीच पुन्हा काम करेन. पण, सध्या चांगल्या भूमिकांसाठी विचारणा होत नाही. मी ओटीटीवर काम करेन की नाही, याबद्दल मला खात्री नाही.”
पुढे त्या म्हणाल्या, “मी डान्स करताना पाहणे धरमजींना खूप आवडायचे, त्यामुळे ते मी थांबवणार नाही. ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकते.
धर्मेंद्र यांच्याबरोबर काम करणाऱ्यांवर त्यांच्या निधनाचा खूप परिणाम झाल्याचेदेखील हेमा मालिनींनी सांगितले. त्या म्हणाल्या, “त्यांच्याबरोबर जे लोक काम करत होते, त्यांचा स्पॉट बॉय अशा सर्वांवरच खूप परिणाम झाला आहे. ते मला येऊन सांगतात की साहेबांची मला खूप आठवण येत आहे, मी त्यांना चहा द्यायचो.”
दरम्यान, हेमा मालिनींनी त्यांच्या आत्मचरित्रात धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, मी त्यांच्याशी कधीही बोलले नाही. माझ्या मुलींच्या मनातदेखील धर्मेंद्र यांच्या कुटुंबाबद्दल आदर असल्याचे लिहिले आहे.

