Dharmendra Last Message to Hema Malini : बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या अभिनयाचा आणि चित्रपटाचा मोठा चाहता वर्ग आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या कुटुंबीयांसाठी या दुःखातून बाहेर येणे अवघड झाले होते. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी व खासदार हेमा मालिनी यांनी अनेकदा त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्या कुटुंबीयांबाबत आणि मुलांबाबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. सनी आणि बॉबी देओल यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल त्यांनी सांगितले असून धर्मेंद्रजींचा शेवटचा मेसेज काय होता याचा खुलासा त्यांनी केला आहे.
‘हिंदी रश’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या सिनेविश्वातील करिअरसह त्यांच्या कुटुंबीयांबाबत मत व्यक्त केले. धर्मेंद्र यांच्या जाण्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना शेवटचा कोणता संदेश दिला होता, याचाही खुलासा त्यांनी केला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत आलेल्या खोट्या बातम्यांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे आमच्या कुटुंबाला खूप त्रास झाल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले आहे.
सनी व बॉबी देओलबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?
हेमा मालिनी म्हणाल्या, “कुटुंब म्हणून आम्ही सगळे कायम एकत्र असतो आणि एकमेकांबरोबर असतो. सनी देओल खूप चांगला व्यक्ती आहे आणि बॉबीसुद्धा खूप चांगला आहे. आम्ही नेहमी एकमेकांबरोबर असतो. फक्त आम्ही लोकांना दाखवत नाही. आम्ही दिखावा आणि पब्लिसिटी करत नाही, आमचं एकमेकांशी खूप चांगलं जमतं आणि आमच्यात एक घट्ट नातं आहे. आम्ही एका सुखी कुटुंबासारखे आहोत.”
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या की, “ते खूप मोठे व्यक्तिमत्त्व होते, त्यांच्याबद्दल सांगायला शब्द कमी पडतात. कोणताही गर्व न बाळगता जमिनीशी नाळ जोडलेले ते व्यक्ती होते. घराबाहेर जर कोणी फोटो काढण्यासाठी आले असेल तर ते कायम त्या चाहत्यांचा मान राखत. त्याला फोटो काढण्यासाठी घरात बोलवून घेत. ते चाहत्यांना खूप आनंदाने भेटत असत, अगदी त्यांना घरी जेवायला या असे सांगत असत. त्यांनी खूप प्रेमांने लोकांना जोडून ठेवले होते.”
धर्मेंद्र यांचा शेवटचा संदेश काय होता?
पुढे त्या म्हणाल्या, “संकटे तर सर्वांच्या आयुष्यामध्ये येत असतात, त्यामुळे या संकटातून बाहेर कसं यायचं याचा विचार करायला धर्मेंद्रजी यांनी शिकवलं. ते खूप प्रेमळ वडील आणि खूप चांगले आजोबा होते. सगळी नातवंडं आणि मुलं त्यांची आजही खूप आठवण काढत आहेत.” धर्मेंद्र यांनी शेवटचा काय मेसेज दिला होता, याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, धर्मेंद्रजींनी मला सांगितले की काहीही झाले तरी संपूर्ण कुटुंबाने कायम एकत्र राहा. कितीही आणि काहीही काम असले तरी कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे, जेवढा मिळेल तेवढा कुटुंबाला वेळ द्या.”
भिक्षासारखे पैसे घेऊन येत असू – हेमा मालिनी
हेमा मालिनी यांनी बॉलीवूडचा एक काळ गाजवला आहे. सिनेविश्वामध्ये त्यांनी अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून एकेकाळी त्या सर्वात जास्त कमावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. याबाबत त्या म्हणाल्या, “आताचा काळ आणि तेव्हाचा काळ यामध्ये तर कोणतीही तुलना होऊ शकत नाही. तो काळच फार वेगळा होता. त्यावेळी मला खूप कमी पैसे मिळायचे. दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मी आवडायचे, पण मी कधीही पैशांसाठी काम केलेले नाही. जसजसे तुम्ही प्रसिद्ध होता, तसतसे तुम्हाला मिळणारे मानधन हळूहळू वाढत जाते. मात्र, आज अभिनेत्रींना जेवढे पैसे मिळतात तेवढे मानधन आम्हाला त्या काळी मिळत नव्हते. आम्हाला निर्माते पाकिटामध्ये जेवढे पैसे टाकून देत आम्ही ते भिक्षासारखे घेऊन येत असू. एवढे पैसे पाहिजे तेव्हाच चित्रपट करणार, असा कधीच विचार केला नाही.”
