Hema Malini On Dharmendra’s Prayer Meetings Rumours : बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं नोव्हेंबरमध्ये निधन झाल्यानंतर त्यांची मुलं सनी देओल व बॉबी देओल आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी व त्यांच्या दोन लेकी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना सभांचं आयोजन केलं होतं. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या दोन ठिकाणी प्रार्थना सभांचं आयोजन केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे देओल कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आहे का, असेही प्रश्न निर्माण झाले. अशातच आता हेमा मालिनी यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

२४ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यावेळी सनी देओल व बॉबी देओल आणि त्यांच्या कुटुंबानं मुंबईत वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. त्याच वेळी हेमा मालिनी यांनीसुद्धा पतीच्या प्रार्थना सभेचं आयोजन केलं. त्यानंतर अभिनेत्रीनं दिल्लीत पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्या आठवणीत प्रार्थना सभेचं आयोजन केलं. यावेळी अनेक राजकीय मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती. हेमा मालिनी यांनी आता यामागचं कारण सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.

ही आमच्या कुटुंबातील खासगी बाब : हेमा मालिनी

ई टाइम्सशी संवाद साधताना हेमा मालिनी यांना दोन वेगळ्या सभेचं आयोजन केल्यामुळे कुटुंबातील मतभेदाबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “ही आमच्या कुटुंबातील खासगी बाब आहे. आम्ही एकमेकांशी बोलतो.” हेमा मालिनी यांनी यावेळी मुंबईसह दिल्ली आणि मथुरा येथे सभेचं आयोजन करण्यामागचं कारण सांगितलं.

हेमा मालिनी वेगवेगळ्या सभेचं आयोजन करण्यामागचं कारण सांगत म्हणाल्या, “मी घरी एका सभेचं आयोजन केलं. कारण तिथे वेगळे लोक येणार होते. त्यानंतर मी राजकारणात असल्यानं दिल्लीत माझ्या त्या क्षेत्रातील मित्र-मैत्रिणींसाठी एक सभा ठेवली होती. त्यानंतर मथुरा माझा मतदारसंघ असल्यानं तिथे एका प्रार्थना सभेचं आयोजन करणं महत्त्वाचं होतं.”

कुटुंबांमध्ये कोणताही वाद नसून, आम्ही ठीक आहोत : हेमा मालिनी

हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसला म्युझियममध्ये कन्व्हर्ट करण्याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “सनी देओलनं तिकडे काहीतरी वेगळं करण्याचं नियोजन केलं आहे. सगळं काही चांगल्या प्रकारे घडत आहे. आम्ही एकदम चांगले आहोत. कोणालाही काळजी करण्याची गरज नाहीये.”

हेमा मालिनी यांना पुढे धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असताना सनी देओल मीडियातील लोकांवर खूप रागावला होता. त्याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “सनी खूप भावुक झालेला आणि रागातही होता. कारण- आमच्या कुटुंबासाठी तो खूप अवघड क्षण होता. त्यावेळी मीडियावाले आमच्या गाड्यांमागे धावत होते आणि त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला होता.”