Hema Malini talked About Prakash Kaur : धर्मेंद्र व हेमा मालिनी बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक होते. दोघांची प्रेमकहाणी त्या काळी खूप गाजलेली. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं आधीच एक लग्न झालेलं आणि त्यांना चार मुलंही होती. पण, तरीसुद्धा हेमा मालिनी व प्रकाश कौर यांच्यामध्ये कधीच वाद-विवाद झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
हेमा मालिनी यांच्याबरोबर धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी प्रतिक्रिया दिलेली. त्यानंतर १९९९ मध्ये हेमा मालिनी यांनी सिमी गरेवाल यांच्याशी संवाद साधताना धर्मेंद्र, त्यांच्या पहिल्या पत्नी व कुटुंबाबद्दल सांगितलेलं. हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्याबद्दल म्हणालेल्या, “तुम्ही एका व्यक्तीवर खूप प्रेम करता. तुम्हालाही त्याच्याकडून खूप प्रेम मिळतं, मग तुम्ही कोणाला त्रास कसा देऊ शकता.”
हेमा पुढे म्हणालेल्या, “मी त्यांना कधीच त्रास दिला नाही. मी त्यांची समस्या समजून घेतली. जेव्हा मी खूप काही दिलं तेव्हा मलाही खूप काही मिळालं.” पुढे त्यांना प्रकाश कौर यांच्याबद्दल नाराजी आहे का, असं विचारल्यानंतर त्या म्हणालेल्या, “अजिबात नाही. म्हणून तर मी सगळ्यात जास्त आनंदी आहे. मग कोणाला त्रास देण्यात काय अर्थ आहे?”
हेमा मालिनी यांच्या हेमा मालिनी द ड्रीमगर्ल या पुस्तकात त्यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, “मला कोणालाही त्रास द्यायचा नाही. धर्मेंद्रजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केलं, त्याचा मला आनंद आहे. त्यांनी वडील म्हणून त्यांची भूमिका साकारली.”
हेमा मालिनी यांची धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रतिक्रिया
हेमा मालिनी यातून प्रकाश कौर यांच्याबद्दल म्हणालेल्या, “मी प्रकाशबद्दल कधीही बोलली नाही; पण मी तिचा खूप आदर करते. फक्त मीच नाही, तर माझ्या मुलीसुद्धा धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचा खूप आदर करतात.”
