गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने गुरुवारी धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनींनी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला हजेरी लावली. हेमा मालिनी व त्यांच्या मुलींची अवस्था कशी आहे, याबद्दल सुनीताने सांगितलं. हेमा मालिनींनी घरी भजन संध्येचं आयोजन केलं होतं, अशी माहितीही सुनीताने दिली.

हेमा मालिनी यांच्या घरी झालेल्या भजन संध्येबद्दल बोलताना सुनीता म्हणाली, “हेमाजींनी घरी भगवद्गीतेचं वाचन ठेवलं होतं आणि भजन संध्या ठेवली होती. आम्ही सर्वजण भजन ऐकत होतो. हेमाजींसमोर मला माझे अश्रू आवरत नव्हते.” हेमा मालिनी पतीच्या निधनानंतर कशा आहेत, असं विचारण्यात आलं. “याबद्दल काय बोलू शकतो…त्यांच्यासाठी हे खूप मोठं नुकसान आहे. धर्मेंद्र एक महान व्यक्ती होते. मला खूप रडायला येत होतं. मी त्यांच्या कुटुंबाचा खूप आदर करते,” असं सुनीता आहुजाने नमूद केलं.

धर्मेंद्र यांच्याबरोबर सुनीता आहुजाने केलेलं काम

धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या आठवणी सुनीता आहुजाने सांगितल्या. “मी सोनी टीव्हीवरील ‘छलकाए जाम’ या गाण्यात धरमजींसोबत परफॉर्म केलं होतं. मी त्यांच्याबरोबर स्टेज शेअर केला होता… तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. मी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा खूप आदर करते. मी ईशा देओलच्याही खूप जवळ आहे. आम्ही धर्मेंद्रजींचे मोठे चाहते आहोत. खरं तर, मी गोविंदाशी लग्न केलेलं, कारण मला वाटलेलं की तो धर्मेंद्र यांच्यासारखा दिसतो. गोविंदा इतका देखणा नाही. धर्मेंद्रजी इंडस्ट्रीमधील सर्वात देखणे हिरो होते. ते इंडस्ट्रीचे खरे ‘ही मॅन’ होते आणि शेवटपर्यंत काम करत होते. त्यांचं मन खूप मोठं होतं,” अशा भावना सुनीता आहुजाने व्यक्त केल्या.

सुनीता आहुजाची दोन महिन्यांपूर्वी गणेश चतुर्थीला धर्मेंद्र यांची भेट झाली होती. “दोन महिन्यांपूर्वी मी त्यांना गणपतीच्या वेळी भेटले होते. मी आणि माझा मुलगा यशवर्धन त्यांच्या घरी गेलो होतो. ईशाने मला गणपतीला आमंत्रित केलं होतं. जेव्हा यशचा जन्म झाला तेव्हा मला नेहमीच वाटायचं की त्याच्यात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासारखे गुण आणि लूक असावे,” असं सुनीता आहुजा म्हणाली.

Dharmendra hema malini unseen photos 8
धर्मेंद्र व हेमा मालिनी (फोटो- इन्स्टाग्राम)

“यश आणि मी ईशाच्या संपर्कात आहोत. हेमाजी देखील आमच्यावर खूप प्रेम करतात. धर्मेंद्रजींचे निधन झाल्यानंतर, गोविंदा सनी आणि बॉबी देओल यांना घरी भेटायला गेला होता. मी मुंबईत नसल्याने मी त्यावेळी जाऊ शकले नाही. मी परत आले तेव्हा मला प्रार्थना सभेबद्दल समजलं. म्हणून मी गुरुवारी हेमा मालिनीच्या घरी गेले,” असं सुनीता आहुजाने सांगितलं.

देओल कुटुंबाने ताज लँड्स एंड येथे आयोजित केलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला सुनीता उपस्थित राहू शकली नाही. “मी तिथे जाऊ शकले नाही. मी नुकतीच हेमाजी आणि ईशा यांना भेटलो. गोविंदा प्रार्थना सभेत धरमजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेला होता,” असं सुनीता आहुजाने सांगितलं.