Hema Malini post for Dharmendra: दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची आज ९० वी जयंती आहे. दोन आठवड्यांपूर्वी धर्मेंद्र यांचं निधन झालं. निधनानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे. त्यांच्या आठवणीत त्यांची मुलं व पत्नी हेमा मालिनी भावुक झाल्या आहेत. हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याबरोबरचे २ फोटो पोस्ट केले आणि आठवणींना उजाळा दिला.
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना केक भरवतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. दुसऱ्या फोटोत त्या लाल रंगाची साडी नेसून धर्मेंद्र यांच्याशेजारी उभ्या आहेत. हेमा मालिनी यांची ही पोस्ट पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत. ते जयंतीनिमित्त धर्मेंद्र यांना आदरांजली वाहत आहेत.
“धरम जी
माझ्या हृदयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
दोन आठवड्यांहून जास्त काळ झाला, तुम्ही मला दुःखी सोडून निघून गेलात. मी हळुहळू यातून सावरायचा प्रयत्न करतेय. मला माहित आहे की तुम्ही नेहमीच माझ्याबरोबर असाल. आपल्या आयुष्यातील आनंदी आठवणी कधीही पुसता न येणाऱ्या आहेत आणि त्या क्षणांना पुन्हा आठवून मला खूप समाधान आणि आनंद मिळतो. आपण एकत्र घालवलेली सुंदर वर्षे, आपल्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या आपल्या दोन सुंदर मुली आणि माझ्या हृदयात आयुष्यभर राहतील अशा सर्व सुंदर, आनंदी आठवणींसाठी मी देवाचे आभार मानते,” असं हेमा मालिनी यांनी लिहिलं.
दरम्यान, धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सनी देओल, बॉबी देओल व प्रकाश कौर यांनी त्यांची प्रार्थनासभा आयोजित केली होती. पण या प्रार्थनासभेला हेमा मालिनी व त्यांच्या मुली गेल्या नव्हत्या. हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरीच भजन संध्येचं आयोजन केलं होतं.
हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी होय. १९८० साली हेमा मालिनी यांनी चार मुलांचे वडील असलेल्या धर्मेंद्र यांच्याशी प्रेमविवाह केला होता. धर्मेंद्र व हेमा मालिनी यांना ईशा व अहाना या दोन मुली आहेत. धर्मेंद्र आयुष्यभर दोन्ही कुटुंबाबरोबर राहिले, पण त्यांची दोन्ही कुटुंबे मात्र कधीच एकत्र येऊ शकली नाही.
