हेमा मालिनी अवघ्या १६ वर्षांच्या होत्या, तेव्हाच दाक्षिणात्य चित्रपट निर्माते त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स देऊ लागले होते. एवढ्या लहान वयात त्यांनी मोठी कामगिरी केली होती. राणी एलिझाबेथ आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या मान्यवरांसमोर त्यांनी नृत्य सादर केलं होतं. १९६० च्या दशकातील आत्मविश्वासू आणि सुंदर शास्त्रीय नृत्यांगनांमध्ये त्यांचा उल्लेख केला जात होता. त्यामुळे हेमा किशोरवयात पोहोचताच निर्मात्यांना त्यांनी अभिनय करावा, असं वाटू लागलं. मात्र, हेमा स्वतः याबाबत ठाम नव्हत्या. त्यांची आई जया चक्रवर्ती यांना मात्र हेमा यांनी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमवावं, अशी इच्छा होती. त्यामुळे दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर यांनी त्यांच्या घरी येऊन चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा त्यांनी ती स्वीकारली. मात्र, काही दिवसांतच श्रीधर यांनी हेमांना चित्रपटातून काढून टाकलं.

त्यानंतर राज कपूर यांच्या चित्रपटातून हेमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि पुढे त्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. आज या ज्येष्ठ अभिनेत्री ७८ वर्षांच्या होत असताना, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील किस्से चर्चेत आले आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर यांनी १६ वर्षांच्या हेमा मालिनी यांना चित्रपटातून पदार्पण करण्याची संधी देण्याचं ठरवलं होतं. मात्र, त्यासाठी त्यांनी हेमा यांचं नाव बदलून सुजाता ठेवण्याचा निर्णय घेतला होता. राम कमल मुखर्जी यांच्या Hema Malini: Beyond the Dream Girl या पुस्तकानुसार, श्रीधर म्हणाले होते, “आजपासून तिचं नाव सुजाता असेल. तिचं सध्याचं नाव तितकं चांगलं नाही.”

दिग्दर्शकाने केलेला अपमान

श्रीधर हेमा मालिनी आणि जयललिता यांच्याबरोबर चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी हेमा यांना फोटोशूटसाठी बोलावण्यात आलं. या फोटोशूटमध्ये त्यांना साडी नेसायला सांगण्यात आलं होतं. मात्र, स्वतःचा लूक पाहून हेमा यांना आपण खूपच बारीक आणि कुरूप दिसत आहोत, असं वाटलं. फोटोशूट सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. एवढंच नाही, तर हेमा मालिनी कधीच मोठी अभिनेत्री होऊ शकणार नाहीत, असं विधानही श्रीधर यांनी सार्वजनिकपणे केलं होतं. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या प्रसंगाबद्दल बोलताना हेमा यांनी आपल्या कुटुंबाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त केली होती.

राज कपूर यांनी दिली संधी

मात्र, हेमा मालिनी यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं. सी. व्ही. श्रीधर यांच्या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांतच त्यांना राज कपूर यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. निर्माते बी. अनंतस्वामी राज कपूर यांच्याबरोबर एक चित्रपट बनवत होते आणि त्यासाठी हेमा यांची निवड करण्यात आली होती. स्क्रीन टेस्टसाठी हेमा यांना आर. के. स्टुडिओमध्ये बोलावण्यात आलं. तिथे त्यांना काही सीन करायला सांगितलं गेलं. राज कपूर हे दिग्दर्शक के. आसिफ यांच्या उपस्थितीत या दृश्यांचं चित्रीकरण करत होते. राज कपूर यांचं व्यक्तिमत्त्व पाहून हेमा भारावून गेल्या होत्या. त्यांनी राज कपूर यांचं वर्णन एखाद्या राजकुमारासारखे असा केला होता. सी. व्ही. श्रीधर यांच्या तुलनेत राज कपूर यांनी हेमा यांना अधिक सहज वाटेल असं वातावरण निर्माण केलं. त्यामुळे कॅमेरा नेमका कुठे ठेवला आहे, याचंही त्यांना भान राहिलं नाही.

राज कपूर यांच्या प्रतिक्रियेची हेमा मालिनी श्वास रोखून वाट पाहत होत्या. त्यांचं सादरीकरण पाहिल्यानंतर राज कपूर म्हणाले, “ही मुलगी भारतीय चित्रपटसृष्टीची पुढची सुपरस्टार असेल.” त्यांच्या या कौतुकाच्या शब्दांमुळे हेमा यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटासाठी त्यांची निवड झाली. हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. ‘सपनों का सौदागर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हेमा मालिनी यांना ‘राज कपूर यांची ड्रीम गर्ल’ म्हणून सादर करण्यात आलं होतं. मात्र, दोघांच्या वयातील मोठा फरक सहज लक्षात येण्यासारखा होता. हेमा १६ वर्षांच्या, तर राज कपूर ४४ वर्षांचे होते. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्या वयातील फरकाचा उल्लेख चित्रपटाच्या पोस्टरवरही केला होता. हेमा यांना ही गोष्ट मजेशीर वाटली होती.

याबद्दल हेमा यांनी सांगितलं होतं, “काही पोस्टर्स खरोखरच मजेशीर होते. त्यावर ४४ वर्षांचे राज कपूर १६ वर्षांच्या हेमा मालिनी यांच्या प्रेमात अशा ओळी लिहिल्या होत्या. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या या सगळ्या प्रकाराचा मी आनंद घेत होते.”