Hema Malini’s Relationship With Sunny & Bobby Deol : दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी दिल्लीत वेगळी प्रार्थना सभा आयोजित केली होती. मात्र, या सभेला सनी देओल आणि बॉबी देओल उपस्थित नव्हते; तर मुंबईतील प्रार्थना सभेला हेमा मालिनी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे हेमा मालिनी आणि सनी देओल-बॉबी देओल यांच्या नात्याबद्दलचे तर्कवितर्क सोशल मीडियावर सुरू झाले होते, ज्यावर हेमा मालिनींनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
हेमा मालिनी आणि त्यांच्या सावत्र मुलांमध्ये सर्व काही ठीक नाही का, असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला. त्यावर हेमा मालिनी यांनी स्पष्टपणे उत्तर देत असं काहीच नसल्याचं म्हटलं. तसेच लोकांना फक्त गॉसिप हवं असतं, असंही त्या म्हणाल्या.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सनी आणि बॉबीबरोबरच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “आमचं नातं नेहमीच चांगलं राहिलं आहे. आमच्यात एकमेकांविषयी आदर आहे. लोकांना आमच्यात काहीतरी बिनसलं आहे, असं का वाटतं, हेच मला समजत नाही. लोकांना फक्त गॉसिप हवं असतं. मी त्यांना उत्तर का द्यायचं? मला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे का? हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. मी एवढंच सांगेन की, आम्ही सगळे खूप आनंदात आहोत.”
इतरांच्या दुःखाचा वापर करून…
त्या पुढे म्हणाल्या, “यावर मला आणखी काही बोलायचं नाही. लोक काय काय गोष्टी बनवतात, तेच कळत नाही. इतरांच्या दुःखाचा वापर करून बातम्या लिहिल्या जातात, हे खूप वाईट आहे. म्हणूनच अशा चर्चांना मी उत्तर देत नाही.”
‘इक्कीस’बद्दल हेमा मालिनी म्हणाल्या…
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ हा नुकताच १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा प्रीमियर सनी आणि बॉबी देओल यांनी मुंबईत आयोजित केला होता. मात्र, हेमा मालिनी त्या प्रीमियरलादेखील उपस्थित नव्हत्या. याबद्दलसुद्धा या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही, असं त्या म्हणाल्या.
हेमा मालिनी सांगतात, “चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी मथुरेला होते. मला इथं माझं काम करायचं होतं. सध्या तो चित्रपट पाहणं माझ्यासाठी खूप भावनिक ठरेल. माझ्या मुलीही तसंच म्हणत आहेत. आम्ही या सगळ्यातून सावरल्यानंतर कदाचित मी हा सिनेमा पाहीन.”
दरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झाल्यास, दोघांचा १९८० साली विवाह झाला होता. दोघांना ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.
