हेमा मालिनी यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे अनेकांना त्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या असं वाटतं, पण आता त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हेमा मालिनी गेल्या दशकभरापासून कोणत्याही हिंदी चित्रपटात झळकलेल्या नाहीत. त्यांचा अखेरचा चित्रपट ‘शिमला मिर्ची’ हा २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. रमेश सिप्पी दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं चित्रीकरण मात्र त्याच्या प्रदर्शनाच्या तब्बल सहा वर्षांपूर्वी पूर्ण झालं होतं. २०१४ पासून या चित्रपटाला वितरक मिळत नसल्याने त्याचं प्रदर्शन लांबलं होतं. आता हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलंय की एखादी दमदार आणि अर्थपूर्ण भूमिका मिळाल्याशिवाय त्या पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणार नाहीत. याबरोबर त्यांनी १९७० च्या दशकात कारकिर्दीच्या शिखरावर असताना मानधनाबाबत पसरलेल्या एका जुन्या चर्चेलाही पूर्णविराम दिला आहे.

मला खूपच कमी मानधन मिळायचं – हेमा मालिनी

अलीकडील एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी एकेकाळी त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होत्या, ही चर्चा फेटाळून लावली. त्या म्हणाल्या, “अजिबात नाही. तुम्हाला हे कोणी सांगितलं? मला खूपच कमी मानधन मिळायचं. मला कधीच इतके पैसे मिळाले नाहीत.” हेमा मालिनी यांनी पुढे स्पष्ट केलं की, त्या काळातील निर्मात्यांना त्या खूप आवडायच्या, मात्र त्यांनी पैशांसाठी कधीच काम केलं नाही. अभिनय आणि चांगल्या भूमिकांनाच त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं.

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, “जशी तुमची लोकप्रियता वाढत जाते, तसतसं मानधनही हळूहळू वाढतं, पण आजच्या अभिनेत्री जसं प्रचंड मानधन घेतात, तसं मानधन मला कधीच मिळालं नाही. त्याच्या काही अंशही मला मिळालं नव्हतं. मात्र, त्या काळात आम्ही जे काम केलं, तीच आमची खरी कमाई होती; केवळ पैशांमध्येच कमाई मोजता येत नाही.” हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.

हेमा मालिनी यांनी सांगितलं की, त्या त्यांच्या दिवंगत पती आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत काम करत होत्या. त्यांनी कधीही स्वतःहून आपलं मानधन वाढवण्याची मागणी केली नाही. निर्मात्याला जितकं मानधन देणं शक्य असेल, तेवढंच मानधन त्या घ्यायच्या.
त्या म्हणाल्या, “निर्मात्याला जास्त मानधन द्यायचं असेल, तर त्याच नेहमीच स्वागत होतं. पण अमुक रक्कम मिळाली नाही तर आम्ही चित्रपट करणार नाही, अशी अट आम्ही कधीच घातली नाही. मी स्वतः कधीही अशी मागणी केली नाही.”

जेवढे पैसे मिळायचे ते भिक्षेसारखं स्वीकारायचो – हेमा मालिनी

हेमा मालिनी यांनी सांगितलं की, हा दृष्टिकोण त्यांना त्यांच्या दिवंगत आई, निर्माती आणि वेशभूषाकार जया चक्रवर्ती यांच्याकडून मिळाला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात जया चक्रवर्ती या हेमा मालिनी यांच्या मॅनेजर म्हणूनही काम पाहत होत्या. त्या म्हणाल्या, “माझी आई निर्मात्यांबाबत खूप उदार होती. एखाद्या निर्मात्याने चित्रीकरणासाठी पैसे नसल्याचं सांगितलं, तर ती काही हरकत नाही असं म्हणायची. मी मीरा हा चित्रपट करत असतानाही निर्मात्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यावेळी आम्ही मानधनाची मागणी केली नाही. निर्माता लिफाफ्यात जेवढे पैसे द्यायचा, तेवढेच आम्ही भिक्षा समजून स्वीकारलं.”

हेमा मालिनी यांनी गेल्या दशकभरापासून चित्रपटांपासून दूर राहण्यामागचं कारणही सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी आधीच खूप चित्रपट केले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात काम करण्याचं भाग्य मला लाभलं. १९७० आणि १९८० च्या दशकात काम करणारे आम्ही कलाकार खूप नशीबवान होतो. त्या काळात अप्रतीम गाणी, उत्कृष्ट कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आजच्या काळाची त्या काळाशी तुलना होऊ शकत नाही, कारण आजचं सिनेमाचं जग वेगळं आहे.”

मात्र, त्यांनी आजच्या चित्रपटसृष्टीबद्दल कोणतीही टीका केली नाही. त्या म्हणाल्या, “आजही अनेक उत्तम चित्रपट बनत आहेत. त्यामुळे आजचा सिनेमा ७०-८० च्या दशकापेक्षा कमी दर्जाचा आहे, असं मला म्हणायचं नाही. दोन्ही काळ आपापल्या पद्धतीने वेगळे आणि खास आहेत. सुवर्णकाळ आयुष्यात एकदाच येतो; तो पुन्हा परत येत नाही.” याबरोबर हेमा मालिनी यांनी पुनरागमनाची शक्यताही व्यक्त केली. “कोणी चांगली आणि दमदार भूमिका ऑफर केली, तर मी नक्की विचार करेन. कदाचित पुन्हा चित्रपटात कामही करेन,” असं त्या म्हणाल्या.