धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली होती. पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सगळीकडे त्यांच्या प्रेमाच्या चर्चा होत होत्या. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये हेमा मालिनींशी दुसरे लग्न केले होते. त्यांना प्रकाश कौरपासून सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता ही चार अपत्ये होती. हेमा मालिनीपासून त्यांना दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल झाल्या. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांना आधीच विवाहित पुरुषाशी लग्न करण्याचा त्यांचा निर्णय कठीण होता का? असं विचारण्यात आलं होतं. त्यांनी काय उत्तर दिलं होतं, ते जाणून घेऊयात.
२०२२ मध्ये इंडिया टुडेला हेमा मालिनींनी मुलाखत दिली होती. तेव्हा धर्मेंद्र यांच्या प्रेमात कशा पडल्या होत्या? असं हेमा मालिनींनी विचारण्यात आलं. “मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा.. खरं तर मी इतका देखणा माणूस कधीच पाहिला नव्हता. तो खूप वेगळा आणि देखणा होता. त्यामुळे मी खरोखर खूप प्रभावित झाले होते. पण त्याचा अर्थ मला त्यांच्याशी लग्न करायचंय असा नव्हता. नंतर आम्ही दोघेही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो,” असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.
हेमा मालिनी एका रूढीवादी तमिळ कुटुंबातल्या होत्या. त्यामुळे आधीच विवाहित व मुलं असलेल्या पुरूषाशी लग्न करणं कठीण निर्णय होता का? असं विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, “एक वेळ अशी होती जेव्हा मला त्यांना म्हणावं लागलं की आता ‘तू आता माझ्याशी लग्न कर.'”

“मला माहित होतं की अडचण आहे, पण मी त्यांच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा केली नव्हती. मला फक्त प्रेम हवं होतं. ते नेहमीच माझ्यासाठी वेळ काढायचे, मग मला आणखी काय हवं होतं? मला त्यांच्याकडून संपत्ती, पैसा किंवा इतर काहीही नको होतं. मला फक्त थोडं प्रेम हवं होतं. बस्स,” असं हेमा मालिनींनी म्हटलं होतं.
हेमा व धर्मेंद्र यांनी लग्न केलं. पण हेमा लग्न करून कधीच सासरी गेल्या नाही. ४५ वर्षांच्या संसारात त्यांनी एकदाही सासरी पाऊल ठेवलं नाही. त्या कायम त्यांच्या घरीच राहिल्या. धर्मेंद्र यांनी आपल्यासाठी, मुलींसाठी जे केलं त्यात आनंदी असल्याचं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. “लोक माझ्याकडे बोट दाखवून बऱ्याच गोष्टी बोलतात. माझ्याबद्दल माझ्यामागे चर्चा करतात. पण मला फरक पडत नाही. धरमजी मला आनंदी ठेवतात, हे मला माहित आहे आणि मला फक्त आनंदच हवा होता,” असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.
