Hema Malini reveals why Dharmendra funeral was private : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं एका आठवड्यापूर्वी निधन झालं. कुटुंबियांनी धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगीत केले. या निर्णयाने धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी निराशा झाली. हेमा मालिनी यांनी आता यामागचं कारण सांगितलं आहे. तसेच धर्मेंद्र यांचे शेवटचे दिवस खूपच वाईट व वेदनादायी होते, असंही त्यांनी नमूद केलं.

चित्रपट निर्माते हमाद अल रियामी यांच्याशी बोलताना हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितलं. कुटुंबियांना धर्मेंद्र यांची अवस्था बघवत नव्हती, असंही त्या म्हणाल्या. हमाद यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींना भेटल्यावर त्यांनी काय सांगितलं त्याबद्दल इन्स्टाग्रामवर माहिती दिली.

धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगीत करण्याचे कारणही हेमा मालिनींनी सांगितले. हमाद यांनी लिहिलं, “मी दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी, दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांना भेटलो. मी त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटलो होतो. यापूर्वी मी अनेकदा त्यांना पाहिलं होतं. पण हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. खूपच वेदनादायक, हृदयद्रावक आहे.”

हेमा मालिनी पतीबद्दल काय म्हणाल्या?

हमाद पुढे म्हणाले, “मी त्यांच्याबरोबर बसलो होतो. त्या गोंधळल्या होत्या आणि त्या मनात सुरू असलेलं द्वंद्व लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या कापऱ्या आवाजात मला म्हणाल्या, ‘मी दोन महिन्यांपूर्वी धर्मेंद्र यांच्याबरोबर शेतात होते, तिथेच मी आज असते तर…आता मी त्यांना तिथे पाहू शकले असते तर..’ हेमा यांनी मला सांगितलं की त्या धर्मेंद्र यांना नेहमी “तुम्ही तुमच्या सुंदर कविता आणि लेखन का प्रकाशित करत नाही?” असं म्हणायच्या. आणि ते म्हणायचे, “आता नाही… आधी मला काही कविता पूर्ण करू दे.” पण त्यांना वेळ मिळाला नाही, ते गेले…”

हेमा मालिनींबद्दल हमाद म्हणाले, “त्या मला म्हणाल्या, ‘आता अनोळखी लोक येतील… ते त्यांच्याबद्दल लिहितील, ते पुस्तकं लिहितील…पण त्यांचे स्वतःचे शब्द कधीच लोकांसमोर येणार नाहीत’.”

चाहते धर्मेंद्र यांना शेवटचं पाहू शकले नाही याचं दुःख…

“मग त्या दुःखी होत म्हणाल्या की चाहते त्यांना शेवटचं पाहू शकले नाही, याबद्दल खूप वाईट वाटतंय. ‘धर्मेंद्र यांना आयुष्यात कधीही कोणीही कमकुवत किंवा आजारी पाहू नये असं वाटत होतं. ते त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपासूनही आपलं दुःख लपवत असे. आणि एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबीय निर्णय घेत असतात,'” असं हमाद यांनी लिहिलं.

हेमा मालिनींबरोबरच्या संभाषणाची आठवण करून देत हमाद पुढे म्हणाले, “मग त्या क्षणभर थांबल्या…अश्रू पुसले… आणि मला म्हणाल्या ‘पण जे घडलं ते चांगलं झालं… कारण, हमाद, त्यांना त्या अवस्थेत तू पाहू शकला नसतास. शेवटच्या दिवसांत त्यांची अवस्था खूप वाईट होती… वेदनादायक होती… आणि त्यांना आम्हीही तसं पाहू शकत नव्हतो’.”