बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला दीड महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. परंतु त्यांचे चाहते आणि कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांचे दुःख आणि या धक्क्यातून सावरण्याबद्दल व्यक्त झाल्या.

हेमा मालिनींनी देओल कुटुंबाशी असलेल्या मतभेदाच्या वृत्तांवरही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दिवंगत पती धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ अजून पाहिलेला नाही, असंही त्यांनी उघड केलं. हेमा मालिनी काय म्हणाल्या, ते जाणून घेऊयात.

हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं की धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी आणलं तेव्हा त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची प्रकृती कशी होती? त्याबद्दल हेमा मालिनी स्क्रीनशी बोलताना म्हणाल्या, “ते शेवटचे काही दिवस घरीच होते. रुग्णालयात गेल्यानंतरही ते घरी परतले होते. तोपर्यंत मला खात्री होती की ते बरे होतील. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालवू लागली. त्याबद्दल आम्ही कोणालाही दोष देऊ शकत नाही. ते बरे होत होते. पण अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेलं. त्यांना अनेकदा रुग्णालयात नेलं होतं आणि दरवेळी ते हसतमुखाने बरे होऊन घरी परतले होते, त्यामुळे यावेळीही आम्हाला तीच आशा होती.”

Award Banner

हेमा मालिनींनी पाहिला नाही धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’

दिवंगत पती धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट इक्कीस पाहिला आहे का? याबद्दल हेमा म्हणाल्या, “चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी मथुरा येथे होते. मला इथे माझं काम करायचे आहे. तसेच मी तो चित्रपट आता पाहू शकत नाही; कारण तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण असेल. माझ्या मुलीही तेच म्हणत आहेत. कदाचित मी तो नंतर पाहेन, जेव्हा मी यातून सावरेल.”

“आमचं नातं नेहमीच चांगलं राहिलं आहे. आमच्यात एकमेकांविषयी आदर आहे. लोकांना आमच्यात काहीतरी बिनसलं आहे असं का वाटतं, हेच मला समजत नाही. लोकांना फक्त गॉसिप हवं असतं. मी त्यांना उत्तर का द्यायचं? मला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे का? हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. मी एवढंच सांगेन की, आम्ही सगळे खूप आनंदात आहोत. लोक आमच्याबद्दल काहीही लिहितात, मला या सर्व अफवांवर उत्तर द्यायचं नाही,” असं हेमा मालिनी यांनी नमूद केलं.