Hema Malini Shares Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांना १२ दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात पसरलेल्या अफवांमुळे देओल कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास झाला. आता डिस्चार्जनंतर धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? याबद्दल हेमा मालिनींनी माहिती दिली आहे.
धर्मेंद्र सध्या जुहू येथील घरी आहेत. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते बरे होत आहेत. धर्मेंद्र यांच्या तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर वेळोवेळी त्यांच्या घरी येत आहेत. धर्मेंद्र रुग्णालयातून परतल्याने दिलासा मिळाला आहे, असं हेमा मालिनींनी म्हटलं आहे.
हेमा मालिनी धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यावर म्हणाल्या…
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुभाष के झा यांच्याशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “माझ्यासाठी हा काळ अजिबात सोपा नाही. धरमजींची प्रकृती आमच्यासाठी खूप काळजीचा विषय आहे. त्यांची मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी खचू शकत नाही, खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. पण हो, ते घरी परतल्याचा मला आनंद आहे. ते रुग्णालयातून बाहेर आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. आता ते त्यांच्या जवळच्या लोकांबरोबर आहेत. बाकी सर्व काही देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.”
उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले होते?
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक डॉ. प्रीत समदानी यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “धर्मेंद्रजींना सकाळी ७:३० च्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कुटुंबाने त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर घरीच उपचार केले जातील.”

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी अनेक कलाकार त्यांच्या घरी जात आहेत. ‘शोले’मधील त्यांचे को-स्टार व मित्र अमिताभ बच्चन यांनी बुधवारी त्यांची भेट घेतली. अमिताभ बच्चन स्वतः कार चालवत धर्मेंद्र यांच्या घरी गेले होते. दुसरीकडे सोशल मीडियावरही चाहते धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
