बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या साडेपाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले असून त्यांच्या वाट्याला आतापर्यंत अनेक विविध भूमिका आल्या आहेत. ज्यामुळे इतर कलाकारांनाही काहीवेळा आश्चर्य वाटायचं. एकदा तर हेमा मालिनी यांनी यावर त्यांना अमिताभ बच्चन यांचा हेवा वाटतो असंही म्हटलेलं.
हेमा मालिनी यांनी ‘आप की आदालत’मध्ये संवाद साधताना बिग बींबद्दल आणि त्यांना मिळालेल्या भूमिकांबद्दल सांगितलेलं. दोघांनीही अनेकदा एकत्र काम केलं असलं आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री असली तरीसुद्धा हेमा मालिनी यांनी मात्र एकदा अमिताभ बच्चन यांना सातत्याने मिळणाऱ्या विविध भूमिकांबद्दल प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केलेली. अभिनेत्री नेमकं काय म्हणाल्या होत्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
हेमा मालिनी नेमकं काय म्हणालेल्या?
मुलाखतीत हेमा मालिनी यांना अमिताभ बच्चन यांच्या ‘पा’ आणि ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ या चित्रपटांबद्दल अमिताभ बच्चन यांना पाहिलं तर या वयातसुद्धा त्यांनी एका मुलाची भूमिका साकारली आणि त्यानंतर ‘बुड्ढा होगा तेरा बाप’मध्ये काम केलं याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणालेल्या, “ते जास्त नशीबवान आहेत. त्यांना विविध प्रकारच्या भूमिका मिळतात. पण, इथे महिलांना इतक्या भूमिका मिळत नाही.”
मला हेवा वाटतो – हेमा मालिनी
पुढे त्यांनी अमिताभ बच्चन यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांबद्दल हेवा वाटतो असं सांगितलं होतं. त्या गंमतीत हसत म्हणालेल्या, “खूप हेवा वाटता, पण आता मी स्वत:ची निर्मिती संस्था सुरू केली आहे त्यामुळे मी चित्रपटांची निर्मिती करणार आणि चांगल्या भूमिका साकारणार आहे. मग मी असो किंवा ईशा मला हव्या त्या लोकांबरोबर काम करणार.”
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं असून ‘शोले’ हा त्यांनी एकत्र काम केलेला चित्रपट बॉलीवूडमधील गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ‘सत्ते पे सत्ता’, ‘गहरी चाल’, ‘नसीब’, ‘कसौटी’, ‘बागबान’, ‘दो और दो पाच’, बुड्ढा होगा तेरा बाप सारख्या अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे.
