Dharmendra & Hema Malini Age Gap : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे बॉलीवूडमधील एकेकाळचे सुपरस्टार. आजही त्यांची क्रेझ कमी झालेली नाही. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ते कायम त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. त्यांची व हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी तर बॉलीवूडमधील गाजलेल्या प्रेमकहाण्यांपैकी एक आहे.

हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनी प्रेमविवाह केला. धर्मेंद्र व त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना चार मुलं आहेत, तर हेमा मालिनींबरोबर दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या इशा देओल व आहाना देओल या दोन मुलींचा जन्म झाला. एकूणच धर्मेंद्र यांना सहा मुलं आहेत. परंतु, तुम्हाला माहीत आहे का धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न झालं तेव्हा हेमा मालिनींचं वय किती होतं?

‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर या त्यांच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेताच हेमा मालिनींबरोबर दुसरं लग्न केलं. त्यांच्या घरात घटस्फोट घेणं मंजूर नव्हतं, म्हणून त्यांनी धर्मांतर करून हेमा यांच्याबरोबर लग्न केलं असंही म्हटलं जातं. परंतु, स्वत: धर्मेंद्र यांनी या गोष्टीचा स्वीकार केला नव्हता आणि धर्मांतर केलेलं नाही असं सांगितलेलं असंही म्हटलं जातं.

हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्यामध्ये आहे ‘इतक्या’ वर्षांचं अंतर

धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न केलेलं. तेव्हा हेमा मालिनी फक्त ६ वर्षांच्या होत्या. तर उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानसुार धर्मेंद्र व हेमा मालिनी यांच्यामध्ये १३ वर्षांचं अंतर आहे. हेमा मालिनी धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं त्यादरम्यान शालेय शिक्षण घेत होत्या. तेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवातही केली नव्हती आणि धर्मेंद्र तेव्हा १९ वर्षांचे होते.

हेमा मालिनी यांचा जन्म तामिळनाडू येथे जया लक्ष्मी आणि वीएसआर चक्रवर्ती यांच्या घरी झालेला; तर हेमा मालिनींची नेटवर्थ २७१ कोटी इतकी आहे. त्यांनी १२ वीपर्यंतचं शिक्षण घेतलं असून त्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रासाठी त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं नाही.

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींबरोबर लग्न केल्यावर प्रकाश कौर यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिलेली. त्यांनी ‘स्टारडस्ट’शी संवाद साधताना, “फक्त माझेच पती का, दुसरं कोणीही त्यांच्याजागी असतं तर त्यांनी माझ्या आणि हेमामध्ये हेमाचीच निवड केली असती” असं म्हटलेलं. यासह त्यांनी त्या हेमा मालिनी कोणत्या परिस्थितीतून जात असतील हे समजू शकतात, पण एक पत्नी आणि आई म्हणून त्या हेमा यांचा स्वीकार करू शकत नाही असंही म्हटलेलं.