Hema Malini’s emotional post: धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर तसेच मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
हेमा मालिनी यांची भावुक पोस्ट
आता हेमा मालिनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल लिहिले, “धरमजी, माझ्यासाठी खूप काही होते. प्रेमळ पती, ईशा आणि अहाना या दोन मुलींचे प्रेमळ वडील, मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या होते.”
“कोणत्याही परिस्थितीत आणि माझ्या कोणत्याही गरजेच्या वेळेसाठी मी ज्याच्यांकडे सर्वात पहिल्यांदा जाऊ शकेन, असे व्यक्ती म्हणजे धरमजी होते. खरेतर ते माझे सर्वस्व होते. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात ते माझ्याबरोबर होते. त्यांनी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या सहज, मैत्रीपूर्ण वागण्याने आपलेसे केले.”
“एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतरही टॅलेंट आणि त्यांच्याकडे असलेल्या विनम्रतेने त्यांना इतर सर्व दिग्गजांमध्येही वेगळ्या उंचीवर नेले. चित्रपटसृष्टीतील त्यांची किर्ती आणि कर्तृत्व सदैव अमर राहील.”
“त्यांच्या जाण्याने माझे जे नुकसान झाले आहे, ते मी शब्दात सांगू शकत नाही. जी पोकळी निर्माण झाली आहे, ती माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल. आम्ही अनेक वर्षे एकत्र घालवली आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी माझ्याबरोबर आहेत. ते खास क्षण मला जगण्यासाठी बळ देतील”, असे म्हणत हेमा मालिनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८० च्या दशकात लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुली आहेत. ईशा व अहाना अशी त्यांची नावे आहेत. ईशाने बॉलीवूडमध्ये काम केले आहे. तर अहानाने कायमच स्वत:ला प्रसिद्धीझोतापासून दूर ठेवले आहे.
धर्मेंद्र यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी त्यांचे प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना मुले होते. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची ओळख झाली. मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
विवाहित धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल हेमा मालिनी यांनी मुलाखतीत वक्तव्य केले होते. जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्र हे विवाहित होते, त्यांना चार मुले होती. त्यामुळे हेमा मालिनींवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यावर हेमा मालिनी म्हणाल्या, “तो फार कठीण निर्णय होता. लग्नानंतर मी माझ्या कामात व्यग्र झाले. त्यावेळी माझ्याकडे खूप काम होते. असे आयुष्य जगण्याचा मी कधीच विचार केला नव्हता; पण परिस्थिती तशी निर्माण झाली. मी परिस्थिती स्वीकारली आणि पुढे गेले. मला त्याबद्दल वाईट वाटत नाही. मी खूश आहे. लोकांना का समस्या आहेत, हे मला समजत नाही.”
धर्मेंद्र यांच्याबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, “एका चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मी त्यांना पाहिले तेव्हा मला त्यांच्याबद्दल आकर्षण वाटले होते. ते खूप देखणे होते. त्यानंतर आम्ही खूप चित्रपटांत एकत्र काम केले. त्यादरम्यान आमच्या चांगले बॉण्डिंग होते. आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो. ते खूप चांगले आहेत. ते कायमच कोणत्याही परिस्थितीत माझ्याबरोबर होते. आऊटडोअर शूटिंगच्या वेळी ते अनेक गोष्टींमध्ये मला मदत करीत असत. त्यांचा मला आधार वाटत असे. त्यामुळे आपोआपच मी त्यांच्यावर अवलंबून राहू लागले. ते सरळ आणि साधे आहेत. ते कोणालाही आवडतील, असेच आहेत.”
