अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक विनोदी चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कुठल्या न कुठल्या कारणांमुळे त्याचा ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं. आधी अभिनेते परेश रावल यांनी यामध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर वाद उदभवला होता. त्यानंतर ते प्रकरण शांत झालं असताना आता या चित्रपटासाठी अजून मोठी अडचण निर्माण झाली आहे.
‘हेरा फेरी 3’ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन आता या चित्रपटाचा भाग राहिलेले नाहीत. चित्रपटाचे निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी याबद्दलची माहिती देत सांगितलं की, ‘हेरा फेरी ३’चं काम योग्य दिशेने सुरू असलं तरी प्रियदर्शन या चित्रपटाशी आता जोडलेले नाहीत.
प्रियदर्शन काय म्हणाले?
हिंदुस्तान टाईम्सने प्रियदर्शन यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, “फिरोज यांनी जे सांगितलं आहे, ते खरं आहे. सध्या माझा हेरा फेरी ३शी कोणताही संबंध राहिलेला नाही.” अशी माहिती त्यांनी मुलाखतीत दिली. प्रियदर्शन यांनी पुढे धक्कादायक विधान करत सांगितलं की, हेरा फेरी ३ प्रत्यक्षात प्रदर्शित होईल की नाही, याबाबतही आता काही शाश्वती नाही.
ते म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, अनेक कायदेशीर अडचणी आणि वैयक्तिक मतभेदांमुळे हेरा फेरी ३ कदाचित कधीच प्रदर्शित होणार नाही. मी या चित्रपटाशी जोडलेलो आहे की नाही, याला फारसं महत्त्व नाही.” यापूर्वी व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनीही प्रियदर्शन ‘हेरा फेरी 3’च्या तिसऱ्या भागाचा हिस्सा नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही मोठी निराशाजनक बातमी आहे. २००० मध्ये प्रदर्शित झालेला ‘हेरा फेरी’ हा चित्रपट कालांतराने खूपच लोकप्रिय ठरला. त्यानंतर नीरज वोरा दिग्दर्शित ‘फिर हेरा फेरी’लाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र ‘हेरा फेरी ३’ गेल्या काही वर्षांपासून विविध कायदेशीर वादांमध्ये अडकला आहे. त्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेने ‘हेरा फेरी’ फ्रँचायझी आणि त्यातील पात्रांचे हक्क त्यांच्याकडे असल्याचा दावा केला आहे. निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
