Hera Pheri 3 Writer Rohan Shankar Exit : राजू, श्याम अन् बाबू भैय्या… हे त्रिकूट असलेला ‘हेरा फेरी’ हा चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे. या चित्रपटाचे आजवर दोन भाग आले आहेत आणि लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘हेरा फेरी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच अनेक जण या चित्रपटासाठी उत्सुक आहेत; पण घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत आहे.

आधी परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्याचे वृत्त आले होते. मग चित्रपटाच्या हक्कांवरून (राइट्स) वाद निर्माण झाला होता आणि आता या चित्रपटाचे लेखक रोहन शंकर हे या प्रकल्पामधून बाहेर पडले आहेत. नुकताच त्यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावेळी त्यांनी कायदेशीर लढाईचा चित्रपटावर कसा परिणाम होत आहे, यावरही मत व्यक्त केले.

‘हेरा फेरी ३’मधून लेखक रोहन शंकर बाहेर पडले

न्यूज18 शी बोलताना शंकर म्हणाले, “माझी बोलणी सुरू होती आणि मी या चित्रपटाचा भाग असणार होतो; पण कायदेशीर अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. जर भविष्यात ‘हेरा फेरी ३’ झाला आणि प्रियदर्शनसर त्याचे दिग्दर्शन करणार असतील, तर कदाचित मी पुन्हा या प्रोजेक्टशी जोडला जाईन.” अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हे दोघेही कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध असून, त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स येणार आहेत.

Award Banner

लेखक शंकर पुढे म्हणाले की, कायदेशीर वादामुळे या चित्रपटाला विलंब होत आहे. ‘हेरा फेरी ३’ सुरू होईपर्यंत प्रियदर्शन कदाचित त्यांचे इतर पाच चित्रपट पूर्ण करतील. सध्या या वादावर कोणताही तोडगा न निघाल्याने हा प्रोजेक्ट अडकून पडला आहे.

प्रियदर्शन आणि अक्षय कुमार सध्या त्यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, जो १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय प्रियदर्शन हे अक्षय आणि सैफ अली खान यांच्याबरोबर ‘हैवान’ चित्रपटावरही काम करत आहेत. तसेच त्यांनी मोहनलाल यांच्यासह आपल्या १०० व्या चित्रपटाची घोषणाही केली आहे.

‘हेरा फेरी ३’चा कायदेशीर वाद नेमका काय आहे?

वृत्तांनुसार, ‘सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनल’चे जी. पी. विजयकुमार यांनी असा दावा केला आहे की, निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्याकडे ‘हेरा फेरी’ फ्रँचायजीचे पूर्ण हक्क नाहीत. त्यांच्या मते, नाडियादवाला यांना फक्त १९८९ च्या ‘रामजी राव स्पीकिंग’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचे हक्क देण्यात आले होते, जो २००० मध्ये ‘हेरा फेरी’ नावाने प्रदर्शित झाला.

दाक्षिणात्य निर्मात्याचा असा आरोप आहे की, नाडियादवाला यांनी कराराचे उल्लंघन करून २००६ मध्ये ‘फिर हेरा फेरी’ हा सीक्वेल बनवला, ज्याकडे त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा नाडियादवाला यांनी या फ्रँचायजीचे हक्क अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या कंपनीला देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा वाद विकोपाला गेला आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.