सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी आणि ब्रेकअपनंतर झालेला वाद हा बॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चित राहिलेल्या प्रकरणांपैकी एक आहे. ऐश्वर्या राय व सलमान खान यांनी पहिल्यांदा ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आणि खऱ्या आयुष्यातही ते एकत्र आले.
२००२ मध्ये शारीरिक व मानसिक त्रासामुळे ऐश्वर्या रायने सलमानबरोबरचं नातं संपवलं. या सर्व गोष्टींना आता जवळपास २५ वर्षे झाली आहेत. पण सलमान व ऐश्वर्याच्या अफेअरबद्दल बऱ्याच गोष्टी, किस्से आजही सांगितले जाते. या दोघांबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी सलमान व ऐश्वर्याच्या भांडणात मध्यस्थी केल्याची एक आठवण मुलाखतीत सांगितली.
सलमान खान दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला यायचा
रेड एफएम पॉडकास्टशी बोलताना हिमानी म्हणाल्या की त्यांनी ऐश्वर्याबरोबर ‘आ अब लौट चलें’ मध्ये काम केले होते. नंतर दोघींनी ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ सिनेमे केले. “ऐश्वर्या तेव्हा इंडस्ट्रीत नवीन होती. आम्ही तेव्हा खूप जवळ होतो,” असं हिमानी यांनी सांगितलं. हैदराबादमध्ये ‘हमारा दिल आपके पास है’ चे शूटिंग करतानाच्या आठवणी हिमानी यांनी सांगितल्या. “आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करायचो. हा तो काळ होता जेव्हा ती व सलमान इंडस्ट्रीत खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते. त्यावेळी सलमान दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला येत असे आणि सकाळी निघून जायचा,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या.
रिलेशनशिपमध्ये असताना सलमान ऐश्वर्यावर खूपदा चिडायचा. दोघेही त्यांच्या समस्या हिमानी यांना सांगायचे. “मला आठवतंय की एकदा आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. ऐश्वर्या अभिषेकबरोबर रोहन सिप्पीच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि सलमान आला होता. तो मला म्हणाला, ‘मी काय म्हणतोय, समजवा हिला. ही स्वतःला खूप सुंदर समजते, पण तिला वहीदा रहमान यांच्याकडे बघायला सांगा.’ यानंतर मी त्याला शांत राहायला आणि गप्प बसायला सांगायचे,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या.
जोडप्यातील अशा भांडणाबाबत काही गोष्टी द आन्सर रूमच्या मानसोपचारतज्ज्ञ सोनल खंगरोत यांना विचारण्यात आल्या. विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांनी दिलेली उत्तरं जाणून घेऊयात.
प्रश्न – जेव्हा एक जोडीदार भांडणात समोरच्याची तुलना करतो, त्याचा आत्मसन्मानावर कसा परिणाम होऊ शकतो?
सोनल खंगारोत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाल्या, “एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी बरेचदा पाहते की, वादात केलेली टीका किंवा तुलना यामुळे जोडीदाराचा स्वतःबद्दलचा आदर हळूहळू नष्ट होतो. यामुळे काळानुसार, त्या व्यक्तीला स्वतःची लाज वाटू लागते, तिचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे नात्यात भीती किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. पुढे याचा परिणाम इंटिमसीवर होऊ शकतो, कारण समोरच्या व्यक्तीला सुरक्षित वाटत नाही. नात्यात तुलना नाही तर प्रेमाने समजावून सांगायला हवं.”
प्रश्न – जोडप्याच्या वादात अडकल्यावर मित्र किंवा सहकाऱ्यांची भूमिका काय असावी?
“एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी मित्र आणि सहकाऱ्यांना असा सल्ला देईन की, तुमची भूमिका ही तटस्थ राहून परिस्थिती शांत करण्याची असावी. निर्णय देण्याची नाही. जेव्हा दोन व्यक्ती भांडणात तिसऱ्या व्यक्तीला ओढतात, तेव्हा सहसा त्यांना त्यांच्या मताला पाठिंबा हवा असतो किंवा मानसिक तणाव नको असतो. अशा वेळी सहानुभूती दाखवणं योग्य पर्याय आहे. कोण बरोबर आणि कोण चूक याचे विश्लेषण केल्यास त्यांच्यातील दुरावा वाढू शकतो,” असं सोनल सांगतात.
यावर आणखी एक चांगला मार्ग म्हणजे काही मर्यादा आखणे. समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्या, दोघांचेही निरोप एकमेकांना पोहोचवू नका, त्यापेक्षा त्यांना एकमेकांशी थेट बोलायला सांगा किंवा तज्ज्ञांची मदत घेण्याचा सल्ला द्या, असंही त्यांनी सांगितलं.
प्रश्न – लोक रागाच्या भरात का बोलतात?
बरेच जण रागात अपमानजनक बोलतात. सोनल खंगारोत यांच्यामते, “अशा मनःस्थितीत, लोक आधी समोरच्याला बोलून स्वतःचा बचाव करतात. समोरच्या व्यक्तीला कमी लेखतात किंवा मनातील खरा त्रास किंवा जोडीदार सोडून जाण्याची भीती लपवण्यासाठी उपरोधिक शब्दांचा वापर करतात. कुटुंबातील जुन्या सवयींचाही यावर प्रभाव असतो.”
सोनल खरंगोत जोडप्यांना काय सल्ला देतात?
- जेव्हा राग येतो किंवा भावनांचा उद्रेक येतो, अशावेळी थोडा वेळ शांत राहा.
- समोरच्यावर आरोप करण्याऐवजी ‘मला असं वाटतं’ अशा वाक्यांचा वापर करा.
- एका वेळी एकाच विषयावर चर्चा करा.
- ‘रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग’ म्हणजेच समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून ते समजलंय असं दाखवा, जेणेकरून दोघांनाही आपलं म्हणणं ऐकलं जातंय असं वाटेल.
नियमितपणे एकमेकांशी संवाद साधणं, भांडणानंतर एकमेकांना आधार देणं आणि प्रसंगी ‘कपल्स थेरपी’ची मदत घेतल्याने नात्यात कटुता न आणता राग व्यक्त करता येऊ शकतो.
