Why Honey Irani and Javed Akhtar separated: जावेद अख्तर यांचे भारतीय सिनेसृ्ष्टीत महत्त्वाचे योगदान आहे. सलीम-जावेद या जोडीने बॉलीवूडला अँग्री यंग मॅन दिला. ही लेखक जोडी प्रचंड गाजली. जावेद अख्तर गीतकार म्हणूनही लोकप्रिय आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ते ओळखले जातात.
जावेद अख्तर हे जितके त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत आले. जावेद अख्तर यांनी स्वत: अनेकदा विविध मुलाखतींमधून त्यांच्या लग्नाबद्दल, मुलांबद्दल तसेच दारूच्या व्यसनाबद्दल वक्तव्य केले आहे.
शबाना आझमी यांच्याबरोबर लग्न होण्याआधी जावेद अख्तर यांचे हनी ईरानी यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, त्यांचे लग्न टिकू शकले नाही. १३ वर्षानंतर ते वेगळे झाले. एका मुलाखतीत हनी ईरानी यांनी यावर वक्तव्य केले होते. जावेद अख्तर यांना त्या पहिल्यांदा कधी भेटल्या होत्या, याबद्दल त्या म्हणालेल्या, “सीता और गीताच्या शूटिंगदरम्यान मी जावेद यांना भेटले होते. मला त्यांची विनोदबुद्धी आवडली होती. तसेच, कोणीही त्यांच्याबरोबर कोणत्याही विषयावर बोलू शकत असे. मला त्यांच्या या गोष्टी आवडल्या होत्या. ” जावेद अख्तर यांनी त्यांना प्रपोज केल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
जावेद अख्तर यांच्याबरोबरचे त्यांचे लग्न का टिकले नाही, याबद्दल हनी ईरानी म्हणालेल्या, “मला माहित नाही की, आमचं लग्न का टिकलं नाही. सगळ्या गोष्टी खूप लवकर घडल्या. त्यांना जे यश मिळालं ते खूप लवकर मिळालं. त्या यशाबरोबर गोष्टी बदलल्या. जावेद अख्तरही व्यक्ती म्हणून बददले, त्यांच्या आजूबाजूची माणसे बदलली. मी त्याबरोबर जुळवून घेऊ शकले नाही. त्यांची दारू पिण्याची सवय सगळ्यात मोठी समस्या होती. ते अनेकांना भेटू लागले. संध्याकाळी घरी येण्याऐवजी बाहेर जास्त काळ राहू लागले. मधल्या काळात खूप गोष्टी घडल्या. आम्ही दोघेही इतके समजूतदार होतो की आमचे लग्न टिकू शकत नाही, हे आमच्या लक्षात आले होते. त्यांनी दारू सोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला.”
पुढे त्या म्हणालेल्या, “आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कारण, गोष्टी व्यवस्थितपणे घडत नव्हत्या. एकमेकांना दोष देण्यापेक्षा आणि भांडण करण्यापेक्षा आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मीही त्यावेळी तरूण होते, समजूतदारपणा नव्हता. त्यामुळे घडलेल्या गोष्टींसाठी मी पूर्णपणे जावेद यांना दोष देणार नाही. सगळ्या गोष्टी खूप लवकर घडल्या. जर लग्नाआधीच आम्ही आणखी काळ थांबलो असतो, तर कदाचित आम्ही लग्नही केले नसते.”
वेगळे झाल्यानंतर जावेद अख्तर यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण नाते असण्याबद्दल त्या म्हणालेल्या, “एकदा तुम्ही वेगळे झाल्यानतंर एकमेकांचा राग करण्यात आणि रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. मी आणि जावेद जेव्हा वेगळे झालो, तेव्हा ३-४ वर्षांनंतर आमच्यातील संबंध चांगले झाले. आमच्यात पुन्हा मैत्री झाली. मुलांना आणि मला त्यांनी कायमच पाठिंबा दिला. पण, शबानाबरोबर चांगले नाते तयार करण्यास मला वेळ लागला. आम्ही दोघींनीही खूप प्रयत्न केले. आता आम्ही चांगल्या मैत्रीणी आहोत. आम्ही एकमेकांच्या वाढदिवसाच्या पार्टीला जातो, आम्ही एकत्र प्रवास करतो”, असे म्हणत शबाना आझमींबरोबर आता मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले.
जावेद अख्तर व हनी ईरानी यांनी लग्नाच्या १३ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.९ डिसेंबर १९८४ ला त्यांनी शबाना आझमींबरोबर लग्नगाठ बांधली.
