रॅपर हनी सिंगला त्याच्या गाण्यांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली, पण प्रसिद्धीच्या हवा त्याच्या डोक्यात इतकी गेली की तो नशेच्या आहारी गेला. नंतर तो अनेक वादात अडकला. आता मात्र तो आपल्या चुका जाहीरपणे मान्य करतो. हनी सिंगला ड्रग्जचं व्यसन जडलं होतं. हे व्यसन अफाट पैसा आणि यशामुळे आलेल्या अहंकारातून जडल्याचं तो सांगते. इतकंच नाही तर शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी त्याला त्याच्या बिघडलेल्या जीवनशैलीबद्दल, वाईट सवयींबद्दल आणि चुकीच्या वागणुकीबद्दल अनेकदा चेतावणी दिली होती, त्याला समजावलं होतं. पण त्याने कोणाचंच ऐकलं नाही. आणि शेवटी तेच घडले, ज्याची भीती शाहरुख आणि अक्षयसह त्याच्या आजूबाजूच्या अनेकांना खूप आधीपासून वाटत होती.

मी स्वतःला देव समजायचो – हनी सिंग

‘एबी टॉक्स’ पोडकास्टवर हनी सिंगने याबद्दल सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, “२०११ ते २०१४ दरम्यान जेव्हा मी माझ्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होतो, तेव्हा पैशाच्या नशेत मी भरकटलो. पैसा, प्रसिद्धी आणि ड्रग्जच्या नशेत मी सगळं काही विसरलो होतो. मला कशाचंच भान नव्हतं. त्या काळात माझी पूर्ण विचारसरणीच बदलून गेली होती. माझी चालण्याची, बोलण्याची पद्धत आणि माझं वागणंही बदललं होतं. मी प्रत्येकाचा अपमान करायचो. मला असं वाटत होतं की माझ्याइतकं यशस्वी कोणीच झालं नाही. मी स्वतःला देव समजू लागलो होतो आणि स्वतःला देव म्हणायचोसुद्धा.”

माझ्या परिस्थितीला मीच जबाबदार – हनी सिंग

हनी सिंगने पुढे सांगितलं की, खूप कमी वयात मिळालेलं यश आणि व्यसनाधीनता यामुळे तो अत्यंत गर्विष्ठ आणि क्रूर बनला होता. या मानसिक स्थितीला त्याने इंग्रजीत ‘डीमनिक स्टेट ऑफ माईंड’ असं म्हटले. “मला स्वतःलाही माझं ते रूप अजिबात आवडत नव्हतं आणि यासाठी कोणतीही प्रसिद्धी किंवा इंडस्ट्री जबाबदार नव्हती, तर मी स्वतःच जबाबदार होतो,” असं हनी सिंग म्हणाला.

बॉलीवूडमधील दिग्गजांनी दिलेली चेतावणी

फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांनी हनी सिंगला नशा न करण्याचा आणि चांगलं आयुष्य जगण्याचा सल्ला दिला होता. “अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार… हे सगळे माझ्यावर बारीक लक्ष ठेवून होते. मी जे काही करतोय, ते सगळं थांबवावं असं त्यांनी मला समजावलं होतं. शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी तर अनेकदा स्पष्ट शब्दांत मला चेतावणी दिली होती. ‘तू जे काही करत आहेस, त्यामुळे तू एक दिवस संपशील, तू बरबाद होशील’ असं त्यांनी म्हटलं होतं,” असं हनी सिंगने सांगितलं.

हनी सिंगला जडलेलं ड्रग्जचं व्यसन आणि करिअरवर झाला परिणाम

दरम्यान, २०१४ मध्ये हनी सिंगची प्रकृती बिघडली. त्यानंतर तब्बल तीन वर्षे तो घराबाहेर पडलाच नव्हता. तो सगळ्यांपासून दुरावला आणि व्यसनाच्या इतक्या आहारी गेला की त्यातच त्याला ‘बायपोलर डिसऑर्डर’ जडला. या आजाराच्या औषधांमुळे त्याचे सगळे केस गळून गेले. २०१४ मध्ये त्याने ड्रग्ज घेणं बंद केलं, पण त्यातून पूर्णपणे बरं व्हायला त्याला ७ ते ८ वर्षे लागली.

या आजारपणातून बरे होत असतानाच, २०१८ मध्ये त्याने ‘सोनू के टीटू की स्वीटी’ चित्रपटातील ‘दिल चोरी…’ या गाण्याद्वारे बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर त्याचं ‘मखना’ हे गाणंही आलं, पण त्याला त्याच्या आधीच्या गाण्यांइतकं यश मिळालं नाही.