Dharmendra ICU Viral Video: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बरी नाही. दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आधी काही दिवस धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी त्यांना जुहू येथील घरी आणलं असून आता घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर सनी देओल भडकला होता, तो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाचा आयसीयूमधील खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ८९ वर्षीय धर्मेंद्र आयसीयूमध्ये आहेत आणि देओल कुटुंबातील सदस्य भावुक होऊन त्यांच्या बेडशेजारी उभे आहेत.

लीक झालेल्या व्हिडीओत नेमकं काय?

लीक झालेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध पडलेले दिसत होते. तर त्यांची मुलं सनी आणि बॉबी देओल त्यांच्या शेजारी उभे होते. व्हिडीओत सनीची मुलं करण आणि राजवीर देओल आणि धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर हे देखील बसलेले दिसत होते. फुटेजमध्ये कुटुंबीय भावनिक दिसत होते.

आयसीयूमधील व्हिडीओ शूट करणाऱ्या कर्मचाऱ्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्या व्यक्तीने परवानगीशिवाय ऑनलाइन फुटेज शेअर केले होते, ज्यामुळे रुग्णाची गोपनीयतेचे उल्लंघन झाले. हा व्हिडीओ पाहूनच सनी देओल पापाराझींवर भडकला होता. ‘तुमच्या घरात आई-वडील आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का?’ असं सनी देओल म्हणाला होता.

प्रकृती बिघडल्यानंतर धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र रुग्णालयात असताना त्यांच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या. त्यानंतर त्यांची पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी ११ नोव्हेंबर रोजी पोस्ट करून ते जिवंत असून बरे होत असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, धर्मेंद्र यांना घरी आणल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांची भेट घेतली. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी हेदेखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. बॉलीवूड कलाकार व नातेवाईक सातत्याने धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी येत आहेत.