बॉलीवूड अभिनेता फरदीन खानने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ वेब सीरिजमधून पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तब्बल १४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर तो पुन्हा मनोरंजन विश्वात सक्रीय झाला. १९९८ मध्ये ‘प्रेम अगन या चित्रपटामधून त्याने या क्षेत्रात पाऊल टाकले. पण या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याच कठीण काळाबद्दल अभिनेत्याने नुकतीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

फरदीन खान हा दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. त्यामुळे वडिलांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं त्याच्यावर दडपण होतं. त्यात फरदीनच्या करिअरचा सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षमय होता. ‘जानशीन’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’, ‘फिदा’ यांसारख्या काही हिट चित्रपटांनंतरही फरदीनला ते स्टारडम मिळू शकलं नाही, जे त्याच्या समकालीन कलाकारांना मिळालं.

याबद्दल सायरस सेज पॉडकास्टमध्ये फरदीनने सांगितलं. तसंच ‘प्रेम अगन’ फ्लॉप झाल्यानंतर वडिलांनी दिलेल्या सुचनेबद्दलही सांगितलं. फरदीन म्हणाला, “माझे वडील म्हणालेले, मी तुझ्या डोक्यावर आता छप्पर देत आहे. मी तुला वर्षभर पैसे देईन. पण त्यानंतर, तुला स्वत:लाच तुझं करायचं आहेस. मी तुला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात पाठवलं आहे. मला आशा आहे की, तू जीवनाला सामोरे जाण्यास तयार आहेस.”

यापुढे फरदीन खान म्हणतो, “मला अभिनेता होण्यापेक्षा चित्रपट निर्माण करणं अधिक पसंत होतं. पण मी लंडनहून परत आल्यानंतर माझ्या वडिलांनी मला ‘प्रेम अगन’ चित्रपटामधून लॉंच करण्याचा निर्णय घेतला. माझे वडील एक अभिनेते असल्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचं माझ्यावर आधीपासूनच खूप दडपण होतं. मी सतत काळजीत असायचो की, आपल्याकडून काही चूक होऊ नये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०२४ मध्ये फरदीन संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमध्ये झळकला. यातील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं. त्यानंतर तो ‘खेल खेल में’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच आता त्याचा ‘हाउसफुल ५’ हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलंच प्रतिसाद मिळत आहे. तसंच आगामी काळात फरदीनचा ‘द डेव्हिल’ हा कन्नड चित्रपटही येणार आहे.