मागील वर्षभर अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या खूप अफवा पसरल्या. दोघेही वेगळे झाले आहेत, त्यांनी ग्रे डिव्हॉर्स घेतला असं म्हटलं गेलं. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर, तर ऐश्वर्या लेक आराध्याबरोबर गेल्यावर हे सगळं सुरू झालं. पण नंतर ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी एका लग्नात एकत्र हजेरी लावली. अभिषेकने सासू वृंदा रॉय व पत्नी ऐश्वर्याबरोबर एक फोटोही काढला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता अभिषेकने घटस्फोटाच्या चर्चांवर लेक आराध्याची प्रतिक्रिया काय आहे, ते सांगितलं.
अभिषेक बच्चनच्या मते, आराध्या बच्चनला त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल माहिती नाही. पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला की आराध्याकडे स्वतःचा फोन नाही. शिवाय, आराध्याला या अफवांपेक्षा अभ्यासात जास्त रस आहे. आराध्याला उत्तम पद्धतीने वाढवल्याबद्दल त्याने पत्नी ऐश्वर्याचे कौतुकही केले.
आराध्याकडे फोन नाही – अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय व तुझ्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल आराध्याला माहिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक बच्चन म्हणाला, “मला आशा आहे की तिला माहिती नसेल. ती खूप समजुतदार मुलगी आहे. ती खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्या आईने तिला खूप चांगल्या पद्धतीने वाढवलं आहे. मला वाटत नाही की तिला या अफवांबद्दल समजलंय. त्याचबरोबर या गोष्टींना ती प्राथमिकता देते, असं मला वाटत नाहीत. तिच्याकडे फोन नाही आणि ती १४ वर्षांची आहे. जर तिच्या मैत्रिणींना तिच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांना तिच्या आईच्या फोनवर कॉल करावा लागतो. आम्ही हे खूप आधी ठरवलं होतं.”
आराध्या अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास…
अभिषेक आराध्याबद्दल पुढे म्हणाला, “तिला तिचा गृहपाठ करण्यात जास्त रस आहे. तिला शाळा खूप आवडते. मला वाटत नाही की ती गुगलवर आमची नावे शोधेल. ती अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. तिच्या आईने तिला आधीच शिकवलंय की ती जे काही वाचते त्यावर विश्वास ठेवू नये. जसे माझे आई-वडील माझ्याबरोबर होते, तसेच आम्ही आमच्या कुटुंबाशी पूर्णपणे प्रामाणिक आहोत. म्हणून कधीच अशी वेळ आली नाही जेव्हा कोणालाही कोणावर संशय घ्यावा लागेल.”
दरम्यान, ऐश्वर्या व अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा बरेचदा होत असतात. पण त्यात काहीच तथ्य नाही. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाबरोबर जलसा बंगल्यात राहत नाही, असं म्हटलं जातं. पण अभिषेकचं संपूर्ण कुटुंब जलसाशेजारी असलेल्या बंगल्यात राहतं. त्यामुळे त्यांचं जलसामध्ये येणं-जाणं असतं. बाकी वेळ अभिषेक, ऐश्वर्या व आराध्या त्यांच्या बंगल्यात राहतात.
