Police Reaction on Director Sanjay Gupta Death: लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी निधन झाले आहे. स्वयंपाकघराच्या फरशीवर पाय घसरून पडल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या वेळी कुटुंबीय आणि घरातील नोकर झोपलेले होते. संजय गुप्ता खाली पडल्याचे उशिरा लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

“त्यांचा पाय घसरून ते खाली पडले असावे असा आम्हाला संशय आहे. त्यांच्या कुटुंबियांना ते पडल्याचं उशिरा समजलं. त्यांनी तातडीने रुग्णालयात नेलं, पण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी, दोन मुलं आणि घरातील नोकर घरीच होते, मात्र ते सर्वजण झोपलेले होते, अशी माहिती डीसीपी पुरुषोत्तम कराड यांनी दिली. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलंय.

कुटुंबाला संजय गुप्तांच्या मृत्यूबद्दल संशय नाही

वर्सोवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे म्हणाल्या, “त्यांच्या अचानक झालेल्या निधनासंदर्भात कुटुंबाने कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. तसेच सध्या तरी काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.”

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. “त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की ते घरात मृतावस्थेत आढळले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही एडीआर नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे,” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

संजय गुप्ता हे क्राइम ड्रामा, गँगस्टर चित्रपट आणि ॲक्शन थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. यामध्ये ‘कांटे’, ‘आतिश’, ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूटआऊट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी १९९४ मध्ये संजय दत्त, आदित्य पांचोली आणि रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आतिश: फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं.