Ranveer Singh Deepika Padukone: बॉलीवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सप्टेंबर २०२४ मध्ये आई-बाबा झाले. मात्र, दीपिका गरोदर असताना रणवीर त्याच्या मेगाब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’च्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र होता. अशा वेळी व्यावसायिक जबाबदारी आणि पत्नीची काळजी यात त्याने कसा ताळमेळ साधला, याचे कौतुक आता त्याचे सहकलाकार करत आहेत. ‘धुरंधर २’ मधील अभिनेता अभय अरोराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, रणवीरला शूटिंगदरम्यान ३-४ दिवसांचा जरी ब्रेक मिळाला, तरी तो वेळ वाया न घालवता थेट फ्लाईटने दीपिकाकडे जायचा. कामाचा प्रचंड ताण असूनही त्याने आपल्या कुटुंबाला दिलेले हे प्राधान्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि आयुष्यातील महत्त्वाचे बदल यांचा ताळमेळ राखणं हे केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही खूप आव्हानात्मक आणि थकवणारं असू शकते. अनेक नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी, कुटुंबातील महत्त्वाचे टप्पे जसे की गरोदरपण आणि करिअरमधील कामाचा ताण एकाच वेळी समोर येतात. अशावेळी जोडीदाराला काळजीवाहू आणि व्यावसायिक या भूमिकांमध्ये कोणत्याही आघाडीवर तडजोड न करता सतत बदल करावे लागतात.

‘धुरंधर २’ मध्ये ‘यासिर’ची भूमिका साकारणारा अभिनेता अभय अरोरा याने याचेच एक उदाहरण दिले आहे. त्याचा सहकलाकार व धुरंधरचा मुख्य अभिनेता रणवीर सिंहने चित्रपटाच्या शेड्यूलमधून वेळ काढत, त्यावेळी गरोदर असलेल्या दीपिका पादुकोणची कशा प्रकारे काळजी घेतली, हे अभय अरोराने सांगितलं.

रणवीर ३-४ दिवसांसाठी करायचा प्रवास- अभय अरोरा

‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत अभय म्हणाला, “शूटिंगच्या दरम्यान रणवीरला जेव्हा कधी तीन-चार दिवसांची सुट्टी मिळायची, तेव्हा तो विमानाने पत्नी दीपिकाजवळ जायचा, जेणेकरून तो तिच्यासोबत राहू शकेल आणि तिची व कुटुंबाची काळजी घेऊ शकेल. रणवीर ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.”

अशी परिस्थिती आजकाल अनेकांसाठी सामान्य झाली आहे. आज बरेच लोक कामाचा प्रचंड व्याप आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यांच्यात कसरत करताना दिसतात. कामही करावं लागतं आणि जोडीदाराची काळजीही घ्यावी लागते. या परिस्थितीत काही जण उत्तम ताळमेळ साधतात, तर काहींना ही दुहेरी आव्हानं पेलताना तणावात असतात. काही वेळा जोडीदाराला वेळ न दिल्याची अपराधीपणाची भावना किंवा मानसिक थकव्याचा त्यांना सामना करावा लागतो.

दरम्यान, धुरंधर व धुरंधर २ बद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही चित्रपट अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींचा गल्ला जमवला. मात्र दीपिका पादुकोणने या चित्रपटाबद्दल किंवा पतीच्या अभिनयाबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे दीपिकावर टीका होत होती. पण तिने स्वतःच एका व्हिडीओवर कमेंट करून सर्वांच्या आधी आपण धुरंधर पाहिला, असं म्हटलं आणि टीकाकारांना सुनावलं.