हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल फारसं उघडपणे बोललं नसलं तरी ते सोशल मीडियावर त्यांचे फोटोज पोस्ट करतात. अलीकडेच, हृतिक आणि सबा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून त्यांच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
हृतिक आणि सबाने एक फोटो शेअर केला ज्यात हृतिकने एक गोल टोपी घातलेली आहे आणि त्याच्या डोळ्यांवर चष्मा आहे. सबाने तिच्या हाताने हृतिकचा हात पकडलेला दिसतो. हृतिकने त्याच्या पोस्टला , “हॅपी अॅनिव्हर्सरी पार्टनर” असं कॅप्शन दिलं तर सबाने देखील तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हाच फोटो शेअर करत “हॅपी ३ इयर्स पार्टनर.” असं लिहिलं आहे.
हेही वाचा…तुषार कपूरची दोन फेसबुक अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाला, “माझी टीम…”
हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिली प्रतिक्रिया
हृतिकच्या पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खानने या पोस्टवर कमेंट केली आहे. सुजैनने या पोस्टवर “सुपर पिक!! हॅपी अॅनिव्हर्सरी अशी कमेंट केली आहे. हृतिकची पुतणी पश्मीना रोशनने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने “आह्ह, किती गोड!” असं लिहील आहे.
हृतिक आणि सबा २०२२ पासून अनेकदा एकत्र दिसतात. ते करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीला हातात हात घालून एकत्र पोहोचले होते. अलीकडेच सबा २०२४ च्या गणेश चतुर्थी उत्सवात हृतिकचे वडील राकेश रोशन यांच्या घरी सहभागी झाली होती. ती पिंकी रोशन, सुनैना रोशन आणि रोशन कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर गणपतीची आरती करताना दिसली.
हृतिकने २०१४ मध्ये घेतला घटस्फोट
हृतिकने यापूर्वी इंटीरियर डिझायनर सुजैन खानबरोबर लग्न केले होते आणि त्यांना रेहान आणि ऋधान ही दोन मुलं आहेत . २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला असून ते एकत्र मुलांचा सांभाळ करत आहेत. सुजैन, ज्येष्ठ अभिनेता संजय खान आणि झरीन खान यांची मुलगी आहे, ती सध्या आर्सलान गोनीला डेट करत आहे.
हृतिक रोशनचे आगामी प्रोजेक्ट्स
हृतिक पुढे यशराज फिल्म्सच्या ‘वॉर २’ मध्ये दिसणार आहे, याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत . हा अॅक्शन-थ्रिलर सिनेमा आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे, ज्यामध्ये ‘पठाण’, ‘टायगर ३’, आणि ‘अल्फा’ या चित्रपटांचा समावेश आहे.