रोशन कुटुंबीयांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ २३ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला आहे. ईशान रोशन व ऐश्वर्या सिंह यांचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या दोघांच्या लग्नासाठी संपूर्ण रोशन कुटुंब एकत्र आलं होतं. बॉलीवूडचे काही सेलिब्रिटी सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक व हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी पुतण्याच्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळतेय. हृतिक रोशन, सबा आझाद, राकेश रोशन व त्यांची पत्नी पिंकी रोशन, मुलगी सुनैना रोशन आणि हृतिकची दोन्ही मुलं रेहान आणि रिदान यांनी या लग्नसोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.

हृतिकने त्याच्या दोन्ही मुलांसह पापाराझींसमोर पोझ दिल्या. याशिवाय लग्नातील संगीत कार्यक्रमात हृतिकने त्याच्या मुलांसह जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. सुखबिरच्या १९९९ मध्ये रिलीज झालेल्या ‘इश्क तेरा तडपावे’ या सुपरहिट गाण्यावर हृतिक, रेहान आणि रिदान हे तिघंही एकत्र थिरकले. या डान्स व्हिडीओमध्ये हृतिकची भाची सुरानिका सोनी आणि चुलत बहीण पश्मिना रोशन देखील डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Award Banner

सध्या हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “रोशन कुटुंबीय फक्त डान्स करत नाहीत…स्टेजवर माहोल क्रिएट करतात”, “वॉव मस्त डान्स केला”, “याला म्हणतात डान्स”, “हृतिकला डान्स करताना पाहिलं अजून काय पाहिजे”, “कदाचित हा पहिलाच व्हिडीओ असेल ज्यात आपण हृतिकला त्याच्या दोन्ही मुलांसह डान्स करताना पाहतोय”, “बाबा तशी मुलं… ” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, सध्या हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघंही गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. यापूर्वी हृतिकने सुझान खानबरोबर २००० मध्ये लग्न केलं होतं. १४ वर्षे संसार केल्यावर या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. रेहान आणि रिदान ही हृतिक-सुझानची मुलं आहेत. २००६ मध्ये रेहानचा जन्म झाला. तर २००८ मध्ये रिदानचा जन्म झाला. सुझान आता अर्सलान गोनीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

दरम्यान, हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तो यंदा ऑगस्टमध्ये ‘वॉर २’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री कियारा अडवाणी झळकली होती.