Hrithik Roshan on Dhurandhar: काही चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत नाहीत, ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. चित्रपटातील प्रत्येक सीन, त्यातील बारकाव्यांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होते. फक्त कथा, कलाकारांचा अभिनयच नाही, तर त्याचे चित्रीकरण कसे केले आहे याबद्दलही बऱ्याचदा चर्चा होताना दिसते.

काही चित्रपट हे काल्पनिक असतात, तर काही चित्रपट खऱ्या घटनांवर आधरित असतात आणि काही खऱ्या घटनांपासून प्रेरित असतात. अशाच काही चित्रपटांपैकी धुरंधर हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धरने केले आहे.

त्यामध्ये आर. माधवन, रणवीर सिंह, अक्षय खन्ना, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि इतर अनेक कलाकार दिसले आहेत. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक जण या चित्रपटाबद्दल बोलत आहेत. प्रेक्षकांसह कलाकारही त्यांची मतं व्यक्त करीत असल्याचे दिसत आहे.

हृतिक रोशन म्हणाला…

आता या सगळ्यात हृतिक रोशनने ‘धुरंधर’विषयी केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. हृतिकने ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लिहिले, “माझं सिनेमावर प्रेम आहे. मला असे लोक आवडतात, जे कथेच्या खोलीत शिरतात. जोपर्यंत स्क्रीनवर त्यांच्या मनातील गोष्ट ते सांगू शकत नाहीत, तोपर्यंत त्यावर ते विचार करतात. याचे सगळ्यात मोठे उदाहरण ‘धुरंधर’ आहे.”

पुढे चित्रपटातील काही गोष्टींवर तो सहमत नसल्याचेदेखील त्याने स्पष्ट सांगितले. अभिनेत्याने, “यामध्ये जे राजकारण दाखवले आहे, त्याच्याशी मी कदाचित असहमत असू शकतो आणि चित्रपट निर्माता म्हणून आपल्या काय जबाबदाऱ्या असतात याबाबत मी नागरिक म्हणून मी प्रश्न उपस्थित करू शकतो. तरीही मी अभिनयाचा विद्यार्थी होण्याच्या नात्याने या सिनेमातून ज्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या, त्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. जे मला शिकायला मिळाले, ते खूप अदभुत आहे”, असे म्हणत त्याच्या भावना व्यक्त केल्या.

नेटकरी म्हणाले…

आता ‘धुरंधर’वर मत व्यक्त केल्यानंतर हृतिक रोशनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका नेटकऱ्याने लिहिले, “मला माहीत नाही की, हे लोक कोणाला घाबरतात. पण, बॉलीवूडनं ज्या पद्धतीनं बाजूला केलं आहे. त्यावरून कळतं की, ते ढोंगी आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले, “हे सगळं तो व्यक्ती म्हणत आहे, ज्यानं ‘फायटर’ व ‘वॉर २’सारखे सिनेमे केले आहेत.” आणखी एकाने लिहिले, “त्याचे स्वतःचे चित्रपट, फिजा, मिशन काश्मीर, जोधा अकबर, युद्ध हे काय होते? आता हा ‘धुरंधर’ला प्रपोगंडा म्हणत आहे”, अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

अशा पद्धतीने ट्रोलिंग होत असताना हृतिक रोशनने आणखी पोस्ट शेअर करीत ‘धुरंधर’ सिनेमा माझ्या मनातून जात नाहीये, असे लिहिले. तसेच त्याने रणवीर सिंह, अक्षय खन्ना, राकेश बेदी, आर. माधवन अशा अनेक कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले.

दरम्यान, आता धुरंधर सिनेमा किती कमाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.