Mickey Dhamejani is Now Eye Surgeon : चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करणारे अनेक जण शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करू लागले. त्यातलंच एक नाव म्हणजे मिकी धमेजानी. तुम्ही हृतिक रोशनचा क्रिश चित्रपट पाहिला असेल, या चित्रपटात हृतिकच्या बालपणीची भूमिका करणारा अभिनेता म्हणजे मिकी धमेजानी होय. मिकी धमेजानी आता डॉक्टर झाला आहे.

मिकी धमेजानीने सोशल मीडियावर अभिनेता हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली होती. ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मिकी आता नामांकित नेत्रतज्ज्ञ झाला आहे. नुकताच हृतिक रोशनचा वाढदिवस होता, त्यामुळे मिकी धमेजानीचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला. आता मिकीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

मिकी धमेजानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मिकीचे एक लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मिकीने आतापर्यंत ४ हजारपेक्षा जास्त डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचबरोबर तो इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवून डोळ्यांशी संबंधित आजार, उपचार व त्याच्या दैनंदिन आयुष्याबद्दल खास गोष्टी सांगत असतो.

Award Banner

मिकी धमेजानी कोण आहे?

लिंक्डइन प्रोफाइलनुसार, मिकी धमेजानीने नवी मुंबईतील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमधून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी पदवी घेतली. नंतर त्याने मुझफ्फरनगर मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. तो एडिनबर्गच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनमध्ये ऑप्थॅल्मोलॉजी रेसिडेन्सी प्रोग्रामचा सदस्य आणि इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी रेसिडेन्सी प्रोग्रामचा फेलो होता. मिकीचे स्वतःचे क्लिनिक आहे. अनेक रुग्णांवर आतापर्यंत त्याने उपचार केले आहेत.

‘क्रिश’ चित्रपटात मिकी धमेजानीने हृतिक रोशनने साकारलेल्या मुख्य पात्राच्या बालपणीची भूमिका साकारली होती. क्रिश हा २००३ च्या “कोई… मिल गया” चित्रपटातील रोहित मेहरा (हृतिक) आणि प्रिया (प्रीती झिंटा) यांचा मुलगा आहे. त्याचं संगोपन आजीने केलंय. आजीची भूमिका रेखाने केली होती. जेव्हा क्रिशला त्याच्या वडिलांच्या कथित मृत्यूमागील सत्य आणि त्याच्या आतील शक्तीबद्दल समजतं, तेव्हा चित्रपटात मोठा ट्विस्ट येतो.

मिकी धमेजानीने क्रिश सिनेमाबरोबरच मिकी ज्युलिया रॉबर्ट्सच्या ‘ईट प्रे लव्ह’ आणि शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं.