Pinkie Roshan Gym Fitness HHH : बॉलीवूडचा आकर्षक व्यक्तीमत्त्व असलेला सुपरस्टार हृतिक रोशन हा त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसून येतो. ५२ वर्षीय हृतिक आजही आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी प्रचंड मेहनत घेतो. मात्र, केवळ हृतिकच नव्हे, तर त्याची आई पिंकी रोशन याही वयाच्या सत्तरीनंतर फिटनेसबाबत तितक्याच जागरूक असल्याचे दिसून आले आहे. त्यांचा व्यायाम आणि फिटनेस पाहून नेटकरी थक्क झाले असून, अनेकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत. नुकताच पिंकी रोशन यांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर करीत निरोगी शरीरासाठी त्यांचा खास मंत्र सांगितला आहे.

पिंकी रोशन या सोशल मीडियावर सक्रिय असून, त्या त्यांच्या आयुष्यातील विविध अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. अनेकदा त्या आपले अनुभव, विचार आणि जीवनशैलीबद्दलची मते मांडताना दिसतात. विविध देशांमध्ये प्रवास करीत निसर्गसौंदर्याचा आनंद घेतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही त्यांचा उत्साह, फॅशन आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करतात. फॅशनसोबतच त्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबतही सजग असून, जीवनात समतोल राखण्यावर भर देतात.

पिंकी रोशन यांचा फिटनेस आणि जिद्द पाहून नेटकरी थक्क

नुकताच पिंकी रोशन यांनी जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. यावेळी त्यांनी शरीर आणि मनाचा समतोल राखण्याचे आवाहन केले. फिटनेससाठी त्यांचा खास HHH (Head, Heart, Hand) हा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी त्या कायम आग्रही असतात आणि याबाबत सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट करीत असतात. त्यांचा फिटनेस आणि जिद्द पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करीत त्यांचे कौतुक केले आहे.

काय आहे पिंकी रोशन यांचा व्यायामाचा मंत्र?

पिंकी रोशन यांनी हा व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “दिवसातील हा माझा सर्वांत आवडता क्षण आहे. डोके, हृदय व हात (Head, Heart, Hand) या तिन्ही गोष्टींना एकत्र ठेवा, ज्यामुळे आयुष्यात समतोल राहील. HHH या पद्धतीचा नियमित सराव करा. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा.” या व्हिडीओमध्ये पिंकी रोशन डंबेल फ्रंट स्क्वॅट्स, कर्टसी लंजेस, अल्टरनेटिंग शोल्डर प्रेस, बेंट-ओव्हर रो व एल्बो प्लँक यांसारखे व्यायाम करताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांनी केले पिंकी रोशन यांच्या व्यायामाचे कौतुक

पिंकी रोशन यांचा हा फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकरी त्यांच्या जिद्दीचे आणि फिटनेसप्रेमाचे भरभरून कौतुक करीत आहेत. नेटकऱ्यांनी पिंकी रोशन यांच्या व्यायामाचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले आहे की, गेली कित्येक वर्षे मी तुम्हाला दररोज व्यायाम करताना बघतो आहे, आणि हा उत्साह पाहून मीच आश्चर्यचकित झालोय. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, तुमचा फिटनेस व व्यायाम खरंच आदर्श आहे.