Hrithik Roshan Real Estate Investment: हृतिक रोशन व कंगना रणौत यांच्यात विविध कारणांमुळे सतत वाद होताना दिसतात. आताही त्यांच्यात वाद-प्रतिवाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता चर्चांच्या या सगळ्या मोहोळात हृतिक रोशन एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
हृतिक रोशनने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. वेळोवेळी त्याने फ्लॅट, ऑफिस, जमीन खरेदी-विक्री केल्याचे समोर येते. नुकतेच हृतिकने त्याचे एक ऑफिस भाड्याने दिले आहे. आता त्याने मुबंईतील कुठले ऑफिस भाड्याने दिले आहे आणि त्याचे किती भाडे त्याला मिळणार आहे, याबद्दल जाणून घेऊ…
हृतिक रोशनने मुंबईतील ६,००० स्क्वेअर फूटचे ऑफिस भाड्याने दिले
CRE Matrix नुसार, हृतिक रोशनने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील जवळजवळ सहा हजार चौरस फुटांचे कमर्शियल ऑफिस Clearsynth Labs Limitedला पाच वर्षांसाठी भाड्याने दिले आहे. त्याचे सुरुवातीचे भाडे १७ लाख इतके आहे.
हृतिक रोशनने भाड्याने दिलेली ही जागा अंधेरी (पश्चिम) येथील न्यू लिंक रोडवरील लोटस नीलकमल बिझनेस पार्कच्या सर्वांत वरच्या मजल्यावर आहे. या ऑफिसचे बांधकाम क्षेत्र अंदाजे ६,००० चौरस फूट असून, त्यात सात कार पार्किंगच्या जागांचा समावेश आहे. कागदपत्रांनुसार, ६८ लाखांची अनामत रक्कमही मोजली गेली आहे.
या कराराची नोंदणी २९ जून २०२६ रोजी झाली. पाच वर्षांसाठी केला गेलेला हा भाडेकरार १ एप्रिल, २०२६ पासून सुरू होऊन ३१ मार्च, २०३१ पर्यंत असेल. करारानुसार पहिल्या तीन वर्षांसाठी म्हणजेच १ एप्रिल, २०२६ ते ३१ मार्च, २०२९ या वर्षांसाठी महिन्याचे भाडे १७ लाख रुपये असणार आहे. १ एप्रिल, २०२९ ते ३१ मार्च, २०३१ या शेवटच्या दोन वर्षांसाठी भाडे वाढणार आहे. दर महिन्याला १९.५५ लाख रुपये इतके या जागेचे भाडे असणार आहे.
हृतिक रोशन काही वर्षांपासून रिअल इस्टेटमध्ये सक्रियपणे गुंतवणूक करीत आहे. काही दिवसांपासून तो त्याच्या मुंबई आणि पुण्यातील जागा कॉर्पोरेट कंपन्यांना ऑफिससाठी भाड्याने देत आहे.
Zapkey नुसार, गेल्या वर्षी हृतिक रोशनने त्याची सी फेस असणारी प्रॉपर्टी गर्लफ्रेंड सबा आझादला एक वर्षासाठी भाड्याने दिली होते. त्याचे प्रत्येक महिन्याचे भाडे ७५ हजार इतके होते. Propstackच्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पेपर्सनुसार, हृतिक रोशन, त्याच्या वडिलांची कंपनी HRX Digitech LLP आणि आई प्रमिला रोशन की कंपनी Filmkunj (Bombay) Pvt Ltd यांनी मिळून अंधेरी पश्चिममधील २८ कोटींमध्ये ऑफिसच्या १० युनिट्सची खरेदी केली आहे.
दरम्यान, हृतिक रोशन त्याच्या विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
