Aditya Dhar Responded To Hrithik Roshan : रणवीर सिंहची मुख्य भूमिका ‘धुरंधर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच ५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी याबद्दल प्रतिक्रिया देत चित्रपटाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. हृतिक रोशननेही या चित्रपटाबद्दल पोस्ट केली होती.

हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत चित्रपटाचं कौतुक केलं होतं. पण, याचवेळी त्याने यामध्ये दाखवण्यात आलेल्या राजकारणाशी तो कदाचित सहमत नसेल असंही म्हटलं होतं. हृतिक रोशनने ‘धुरंधर’बद्दल म्हटलेलं की, “माझं सिनेमावर प्रेम आहे. कथेच्या खोलात जाऊन जोवर मनातील गोष्ट सांगण्यात, मांडण्यात यश मिळत नाही, तोवर जे त्याबद्दल विचार करणारे लोक मला आवडतात आणि धुरंधर याचंच उदाहरण आहे.”

“यामध्ये जे राजकारण दाखवलं आहे त्याच्याशी मी कदाचित सहमत नसेन आणि चित्रपट निर्माता म्हणून आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत याबाबत मी नागरिक म्हणून प्रश्न उपस्थित करू शकतो. तरीही मी अभिनयाचा विद्यार्थी या नात्याने या सिनेमातून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही,” असं हृतिक रोशन म्हणाला होता. यानंतर हृतिकने एक्सवरही पोस्ट करत ‘धुरंधर’बद्दल प्रतिक्रिया दिली होती. आता हृतिक रोशनच्या या प्रतिक्रियेवर ‘धुरंधर’चा लेखक व दिग्दर्शक अदित्य धरने प्रतिक्रिया दिली आहे.

अदित्य धरची प्रतिक्रिया

अदित्य धर हृतिक रोशनच्या पोस्टबद्दल म्हणाला, “‘धुरंधर’ला दिलेल्या प्रेमासाठी मी तुमचा आभारी आहे सर. प्रत्येक कलाकाराने आणि प्रत्येक विभागाने या चित्रपटासाठी १०० टक्के दिले आहेत आणि तुमच्याकडुन कौतुक होणं आमच्या संपूर्ण टीमसाठी मोठी गोष्ट आहे. त्या सगळ्यांचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. २ भाग लवकरच येत आहे आणि आम्ही पुन्हा या प्रोत्साहनाला पात्र ठरण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू.”

दरम्यान, ‘धुरंधर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक सेलिब्रिटी देखील याचं कौतुक करत आहेत. तर १९ मार्च २०२६ला ‘धुरंधर’चा दुसरा भागही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘धुरंधर’ पाहिलेल्या प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे.